मनोज मेस्त्री यांना शास्त्रीय संगीतातील स्वरसिंधुरत्न पुरस्कार जाहीर

मनोज मेस्त्री यांना शास्त्रीय संगीतातील स्वरसिंधुरत्न पुरस्कार जाहीर

*कोकण Express*

*मनोज मेस्त्री यांना शास्त्रीय संगीतातील स्वरसिंधुरत्न पुरस्कार जाहीर…!*

*पं. जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राच्या विद्यार्थ्यांचे शास्त्रीय गायन स्पर्धेत उल्लेखनीय यश…!*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित पं.जितेंद्र अभिषेकी सघन गान केंद्राच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळविले आहे.

कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने कुडाळ, वालावल येथे कै.डॉ.अशोक प्रभू स्मृती जिल्हास्तरीय हिंदुस्थानी शास्त्रीय गायन स्पर्धा झाली. या स्पर्धेतील शालेय गटामध्ये ऋचा पिळणकर, युवा गटामध्ये देवयानी केसरकर व खुल्या गटामध्ये सघन गान केंद्राचे गुरु पं.डॉ.समीर दुबळे यांचे शिष्य मनोज मेस्त्री यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. तर सघन गान केंद्राची विद्यार्थिनी श्रुती सावंत हिने बाल गटामध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे.

मनोज मेस्त्री हे कोकणातील नामवंत संकल्पनाकार असून, स्वतःचा व्यवसाय सांभाळून गेली आठ वर्षे गुरू पं. समीर दुबळे यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेत आहेत. यापूर्वी त्यांचे शास्त्रीय गायन पं.जितेंद्र अभिषेकी महोत्सव कणकवली सन २०१९, प्रकाश आमटे यांच्या हेमलकसा येथील सोहळा सन २०१९, स्वरभास्कर सन २०२२ रत्नागिरी येथे झाले आहे. तसेच शास्त्रीय संगीत प्रचारार्थ त्यांचे जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर अनेक कार्यक्रम होत असतात.

तिन्ही गटातील स्वरसिंधुरत्न पुरस्कार विजेत्यांचे गायन येत्या आषाढी एकादशीला म्हणजे १० जुलै २०२२ रोजी वालावल लक्ष्मीनारायण मंदिरात होणार आहे. त्यावेळी या पुरस्काराचे वितरण होणार आहे असे आयोजक प्रा. प्रशांत धोंड, डॉ. प्रणव प्रभू, अक्षय प्रभू यांनी जाहीर केले.

या स्पर्धेचे परीक्षण मुंबई स्थित जेष्ठ गायक प्रदीप धोंड व कोल्हापूर येथील सुप्रसिद्ध गायिका मुग्धा देसाई यांनी केले.स्पर्धेत तिन्ही गटांमध्ये मिळून २७ स्पर्धक सहभागी झाले होते.

वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित सघन गान केंद्र कणकवलीचे गुरु पं. समीर दुबळे, संस्थेचे अध्यक्ष उदय पंडित तसेच कार्याध्यक्ष ऍड. एन. आर. देसाई यांनी मनोज मेस्त्री यांच्यासह यशस्वी विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले आहे.

पहिला स्वरसिंधुरत्न पुरस्कार मनोज मेस्त्री यांना !
या जिल्हास्तरीय स्पर्धेच्या निमित्ताने मनोज मेस्त्री यांना शास्त्रीय संगीतातील पहिला स्वरसिंधुरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!