*कोकण Express*
*बॉक्सवेल ब्रिजचा कणकवलीतील विषय संपला*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातील बॉक्सवेल ब्रिज काढून त्याठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज करणे ही आमची मागणी आहे व ती मागणी पूर्ण झाल्याशिवाय फ्लायओव्हर ब्रिजवरून वाहतूक सुरू होणार नाही. या विषयात आता मी आहे. त्यामुळे बॉक्सेवेल ब्रिज हा विषय आता संपला. असे स्पष्ट करत आमदार नितेश राणे यांनी महामार्ग प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता सलीम शेख व ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच माझ्या बैठका एवढ्या सोप्या घेऊ नका असा इशाराही राणे यांनी अधिकाऱ्यांना दिला. महामार्ग ठेकेदार कंपनीने कोसळलेल्या बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी सिमेंटच्या प्लेट उभारत ते काम पूर्ण करण्याचे प्रस्तावित असल्याचे सांगितले. मात्र नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्याला कडाडून विरोध करत आमची फ्लाय ओव्हर ब्रिजची मागणी आहे. अशी मलमपट्टी करू देणार नाही असा इशारा दिला.
कणकवली नगरपंचायत मध्ये शहरातील महामार्गाच्या समस्येबाबत बैठकीत आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता सलीम शेख, दिलीप बिल्डकॉन चे व्यवस्थापक के के गौतम, आर बी परिहार, शाखा अभियंता कुमावत, नगरसेवक अभिजीत मुसळे, मेघा गांगण, शिशीर परुळेकर, अशोक करंबेळकर, नितीन पटेल, महेश सावंत, संजय मालंडकर, आर टी फॅक्टर चे अभियंता एन के सिंग आदी उपस्थित होते. या बैठकीत श्री नलावडे यांनी कणकवली नगरपंचायत च्या नळ योजनेच्या पाइपलाइनवर चार ठिकाणी गटारांचे बांधकाम झाले आहे. तेथील पाईपलाईन शिफ्ट करून द्या या पाईपलाईन वरून नळ कनेक्शन देणे नगरपंचायत ला शक्य होणार नाही अशी मागणी केली.त्यावर आमदार नितेश राणे यांनी वारंवार प्रश्न मांडूनही जर सुटत नसतील तर तुमच्याकडे प्रश्न मांडून उपयोग काय असा प्रश्न उपस्थित केला. भूसंपादन बाबत काही प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे कामे रखडली आहेत. ही कामे केव्हा मार्गी लागणार असा प्रश्न आमदार नितेश राणे यांनी कार्यकारी अभियंत्यांना विचारला. त्यावर कार्यकारी अभियंत्यांनी पंधरा दिवसात प्रश्न मार्गी लावतो असे सांगितले. पण तुम्ही जो दिवस देता त्या वेळेत कामे पूर्ण होत नाहीत हा आतापर्यंतचा अनुभव आहे. तुम्ही माझी ची मिटिंग एवढी हलकी घेऊ नका असा इशाराही श्री राणे यांनी दिला. डिसेंबर मध्ये फ्लाय ओव्हर ब्रिज पूर्ण होईल असे सलीम शेख यांनी सांगितले. तर जानेवारीत फ्लाय ओव्हर ब्रिज वरून वाहतूक सुरू होईल 26 जानेवारी पर्यंत ची डेडलाईन असल्याचे गौतम यांनी स्पष्ट केले. त्यावर श्री राणे यांनी तुमच्या दोघांच्याही सांगण्या मध्ये एकवाक्यता येत नाही विश्वास कसा ठेवायचा. भूसंपादनाचा प्रश्न सरकारच्या अखत्यारीत आहे. सरकार महाराष्ट्राचे आहे. मध्यप्रदेशचेज नाही असे खडे बोलही श्री राणे यांनी सुनावले. त्यावर सलीम शेख यांनी बॉक्सेल ब्रिजच्या ठिकाणी फ्लाय ओव्हर ब्रिज चा प्रस्ताव पाठविला असून, त्यासाठी 40 कोटीचा निधी अपेक्षित आहे. सदर काम मंजूर झाल्यावर केले जाईल असे स्पष्ट केले. त्यावर श्री नलावडे यांनी आम्हाला कोसळलेल्या बॉक्सल ब्रीज च्या ठिकाणी फ्लाय ओव्हर हवा. कोणत्याही परिस्थितीत प्लेट द्वारे बॉक्स करू देणार नसल्याचा पवित्रा घेतला. हा विषय आता आमच्यासाठी संपलेला असून या प्रश्नी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्या जवळ माजी मुख्यमंत्री नारायण राणे, प्रमोद जठार, निलेश राणे हे पाठपुरावा करत असून, येथे फ्लय ओव्हर ब्रिज होईल असे त्यांनी स्पष्ट केले. गांगो मंदिर पासून एकशे दहा मीटर चा बॉक्स ब्रिजचा भाग काढून तेथे फ्लय ओव्हर ब्रिज करण्याबाबतचा प्रस्ताव अगोदरच पाठविण्यात आल्याचे सलीम शेख यांनी सांगितले. शहरातील रस्त्याच्या बाजूला गटारे बांधली त्याचे स्लॅप तुटले आहेत. हे स्लॅब जाड घालण्याची गरज होती. अनेक रस्ते जोडले जातात. त्यामुळे ही गटारे तुटत असतात अशी भूमिका महेश सावंत यांनी मांडली. त्यावर आमदार श्री राणे यांनी या गटारांचा तिसरा पावसाळा जाणार नाही असे सांगत नाराजी व्यक्त केली. गटाराची डिझाईन फॉल्टी असल्याचा मुद्दा नितीन पटेल यांनी मांडला. तसेच महामार्गावरून शहरात ला जोडणारे रस्ते आहेत तेथील डांबरीकरण आठ एमएम जाडीचे करा अशी मागणी नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी केली. तर गटाराच्या बाजूच्या भागात माती टाकलेली नसल्याने अपघात घडण्याची भीती असल्याची मुद्दा शिशिर परुळेकर यांनी मांडला. गडनदी नजीक असलेल्या स्मशानभूमीजवळ रिटेनिंग वॉल बांधण्याची मागणी यावेळी करण्यात आली. तुम्हाला गेले दोन वर्षे वारंवार तेच विषय सांगावे लागतात या बैठकांचा उपयोग काय असा सवाल राणे यांनी केला. गांगो मंदिर व एस एम हायस्कूल जवळ अंडरपास मध्ये लाइट लावण्यात आलेली नाही. तसेच या दोन्ही बाजूच्या सर्व्हिस रोडवर स्पीड बेकर व बहिर्वक्र आरसे लावा अन्यथा येथे अपघात होण्याची भीती असल्याचा मुद्दा शिशिर परुळेकर यांनी मांडला. लक्ष्मिदत्त कॉम्प्लेक्स येथील ट्रांसफार्मर अन्य ठिकाणी शिफ्टिंग करता येणार नसल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले. ज्या बिल्डिंगच्या साठी ट्रांसफार्मर आहे त्याच भागात तो राहिला पाहिजे. सर्व्हिस रोडवर वाहने पार्किंग केल्याने काम करताना अडथळा येत असल्याचा मुद्दा श्री गौतम यांनी मांडला. त्याबाबत श्री राणे यांनी नगरपंचायतीने नो हॉकर्स झोन ची अंमलबजावणी करायला हवी अशी सूचना दिली. कणकवली पटवर्धन चौक येथे तीन टॉयलेट, बाथरूम करण्याची मागणी वारंवार करूनही त्याची पूर्तता झाली नसल्याचा मुद्दा नगराध्यक्ष श्री नलावडे यांनी मांडला. तसेच ज्या ठिकाण ब्रिज चे काम पूर्ण झाले आहे तेथे रेलिंग लावण्याचे काम तातडीने करा अशी सूचना श्री नलावडे यांनी दिली. शहरात रिक्षा स्टॅन्ड, सहा सीटर चे स्टँड, टेम्पो स्टँड, याबाबत जागा नगरपंचायत ठरवून देईल. त्यासाठी सध्या असलेली जागा रेलिंग घालून मोकळी ठेवा अशी सूचना नगराध्यक्षांनी मांडली. त्याबाबत श्री राणे यांनी तातडीने कार्यवाहीच्या सूचना दिल्या. पटवर्धन चौकात शौचालय व बाथरूम करण्यासंदर्भात मुख्य अभियंत्यांकडून मंजुरी घेऊ त्यामुळे तेथे ही कामे करताना ती अधिकृत होतील असे श्री सलीम शेख यांनी सांगितले. एकदा सुरू झाल्यानंतर ती बंद होता नयेत या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार राणे यांनी दिल्या. फ्लाय ओव्हर चे काम 26 जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती गौतम यांनी दिली. मात्र जोपर्यंत बॉक्सल ठिकाणी फ्लय ओव्हर होत नाही तोपर्यंत तुम्ही तारीख कशी ठरवतात. हायवेच्या कामांमुळे जनतेला त्रास होत आहे. त्यामुळे ही कामे उशीराने करत राहिला तर चालणार नाही. तातडीने कामे पुरी झाली पाहिजेत असे श्री राणे यांनी सांगितले. कार्यकारी अभियंता म्हणून तुम्ही जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी बो’लावल्याशिवाय येत नाही आठवड्यातून एकदा तरी तुमची जिल्ह्यात विजिट व्हायला हवी. अशी सूचना श्री राणे यांनी कार्यकारी अभियंता यांना दिली. गेली दोन वर्ष कामे सांगितली तरीही ती केली जात नाहीत असा मुद्दा संजय मालंडकर व अशोक करंबेळकर यांनी मांडला. काही घटना घडली की हायवे चे अधिकारी फोन बंद करतात असा आरोप मालंडकर यांनी केला. जर बॉक्सेल ब्रिज या ठिकाण फ्लाय ओव्हर ब्रिज करायचे असेल तर महामार्गावरून वळविण्यात येणारी वाहतूक वळविण्याची गरज नसल्याचा मुद्दा गौतम यांनी मांडला. तर पोलिस विभागाकडून श्री गुरव यांनी महामार्गावरील अवजड वाहतूक फोंडा, हरकुळ मार्गे वळविण्यात येणार असल्याचे सांगितले. आम्हाला नुसते तोंडी बोलणे नको, मंजूर झाले तर वाहतूक वळविण्याची गरज नाही, असे पत्र संबंधित विभागांना व नगरपंचायत ला द्या अशी सूचना श्री राणे यांनी दिली. लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्स येथे आर ओ डब्ल्यू लाईन कुठपर्यंत आहे त्याची सर्वांना माहिती आहे. त्यामुळे आर ओ डब्ल्यू लाईन पर्यंत जागा ताब्यात घेऊन काम व्हायला हवं. अन्यथा शहराला वारंवार त्रास भेडसावणार असल्याचे समीर नलावडे यांनी सांगितले. सर्व्हिस रोडचा मुद्दा लवकरच क्लिअर केला जाईल. प्लान्ट सुरू आहे . आजच कामे करतो असे आश्वासन गौतम यांनी दिले. तर अर्धवट असलेल्या इमारतींबाबत ज्यांचे पैसे दिलेले नाहीत त्यांच्या इमारती पाडण्यासाठी प्रेशर करू नका. त्यांचे पैसे अगोदर द्या अशी भूमिका नितेश राणे यांनी मांडली. नागरिकांना वारंवार होणाऱ्या त्रासाबाबत अनेकदा सूचना दिल्या मात्र तरीही ही समस्या सुटत नसतील तर रोज रोज मीटिंग घेणे शक्य होणार नाही. कामे झाली पाहिजेत कारणे नको अशा सूचना श्री राणे यांनी दिल्या.