*कोकण Express*
*बिबट्या कातडे वाहतूकप्रकरणी आणखी एकास अटक…!*
*मुख्य संशयित आरोपी पोलिसांच्या रडारवर…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
दुचाकीवरून बिबट्याचे कातडे नेत असताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईबाबत आणखी एका संशयितास कणकवली पोलिसांनी सोमवारी ताब्यात घेतले. सदरच्या संजय पुंडलिक घाडीगांवकर (५०, रा. महाळुगे, ता. देवगड) या संशयितास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती तपासी अंमलदार तथा पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ यांनी दिली. ही कारवाई एलसीबीच्या पथकाने कासार्डे ते पडेल कॅन्टीन रस्त्यावर दारूम येथे शनिवारी दुपारी ३.१५ वा. सुमारास केली होती. यात जवळपास ८ लाख रुपये किमतीचे कातडे व दुचाकी जप्त करतानाच दुचाकीवरील सुभाष विलास तावडे (२९, ओझरम) व प्रकाश अण्णा देवळेकर (४३, महाळुगे, ता. देवगड) या दोन संशयितांनाही अटक करण्यात आली होती. दोघेही आता पोलीस कोठडीत आहेत. तर अकेतील याच दोन संशयितांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी संजय घाडीगांवकर याला अटक केली. संशयित सुभाष व प्रकाश यांनी संजय याच्याकडूनच सदरचे कातडे ताब्यात घेतले होते, असे तपासात निष्पन्न होत आहे. पण, बिबट्याची शिकार कुणी केली, हे अद्यापही गुलदस्त्यात आहेत. मात्र, आणखी एक संशयित पोलिसांच्या रडारवर असल्याची माहिती श्री. हाडळ यांनी दिली.