*कोकण Express*
*वन विभागाच्या अथक प्रयत्नानंतर,माजगाव मध्ये विहिरीत पडलेल्या गव्यांच्या पिल्लांना जीवदान!*
सावंतवाडी वनपरिक्षेत्रामधील माजगाव मध्ये नरेंद्र डोंगरालगत असलेल्या मा.भाई सावंत यांच्या समाधी परिसरातील एक विहिरीमध्ये आज सकाळी गव्याची, अंदाजे एक ते दीड वर्षे वायची दोन लहान पिल्ले पडली असल्याचे स्थनिक नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी वनपरिक्षेत्र कार्यालय, सावंतवाडी यांना याबाबत कल्पना दिली. सावंतवाडीचे वनपरिक्षेत्र अधिकारी मदन क्षीरसागर यांच्यानेतृत्वाखाली वनविभागाची रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली.
घटनास्थळी दाखल झाल्यानंतर रेस्क्यू टीमच्या असे लक्ष्यात आले की रात्री उशिरा गव्यांचा कळप त्या ठिकाणाहून जात असताना ही लहान पिल्ले अपघाताने विहीर पडली असावीत. सदर विहीर ही अंदाजे 30 फूट खोल होती व त्याखाली 10 फूट पाण्यात ही गव्यांची पिल्ले पोहोत होती. बघ्यांची मोठी गर्दी, खोल असलेली विहीर अन त्यात पाण्यात पोहोत असलेली दोन गव्यांची पिल्ले अश्या सर्व बिकट परिस्थिती वर मात करत वनविभागाच्या रेस्क्यू टीम ने आपले मदतकार्य सुरू केले.
प्रथमतः विहिरीतील पाणी डिझेल इंजिनाच्या सहाय्याने उपसून कमी करण्यात आले. त्यानंतर जाळीच्या साहाय्याने पिल्लांना वर काढण्याचा प्रयत्न केला गेला, परंतु तो प्रयत्न निष्फळ ठरला. या अथक प्रयत्नानंतर वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर, वनरक्षक-दत्तात्रय शिंदे, सागर भोजने, रामचंद्र रेडकर ही सर्व टीम रेस्क्यू टीम स्वतः विहिरीत उतरली व त्यांनी या दोन पिलांना दोरीच्या सहाय्याने बांधून वर काढले. वर काढलेली दोन्ही पिल्ले सुदृढ असलेने वर काढलेल्या गव्यांच्या पिल्लांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.
या सर्व बचावकार्यत माजगाव मधील स्थानिक नागरिकांची मोलाची मदत लाभली. या बचावकार्यत वनपाल-प्रमोद सावंत, प्रमोद राणे, वनरक्षक-वैशाली वाघमारे, प्रकाश पाटील,अप्पा राठोड, वनमजुर-सावंत वाहनचालक रामदास जंगले या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभले.