*कोकण Express*
*राणेंनी तेली – नलावडे यांच्यामधील भाजी मार्केटचा वाद मिटवावा!*
*राणेंच्या सूचना सत्ताधाऱ्यांकडून धाब्यावर; विरोधी गटनेते सुशांत नाईक यांची टीका!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणेंनी नगरपंचायत मध्ये भाजी विक्रेत्यांसंदर्भात बैठक घेऊन स्टंटबाजी करण्यापेक्षा त्यांच्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली व नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यात असलेला भाजी मार्केट बील्डींग चा वाद मिटवावा. आणि नगरपंचायतच्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या भाजी मार्केटमध्ये भाजी विक्रेत्यांना नियमानुसार जागा उपलब्ध करून द्यावी. असा टोला कणकवली नगरपंचायत चे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आमदार नितेश राणे यांच्यावर लगावला आहे. आमदार नितेश राणेंनी नगरपंचायतीत बैठक घेऊन सूचना दिल्या परंतु आज दोन दिवस होऊनही प्रत्यक्षात कणकवलीत काय स्थिती आहे याचे त्यांनी आत्मपरिक्षण करावे. राणेंच्या सूचना नगरपंचायत सत्ताधाऱ्यांनी धाब्यावर बसविल्या आहेत. आमदार नितेश राणेंना भाजीविक्रेत्यांसदर्भात नगरपंचायतीत बैठक घ्यावी लागते, यावरूनच नगरपंचायतचे नगराध्यक्ष व सत्ताधारी हे कचरा टेंडर, ठेकेदारी व बिल्डिंगमध्ये गुंतलेले आहेत. याला नितेश राणेंनी दुजोरा दिलेला आहे. नगरपंचायतचे सत्ताधारी अकार्यक्षम ठरल्याने आमदारांना भाजीविक्रेत्यांसाठी नगरपंचायतीत येऊन बैठक घ्यावी लागते ही दुर्दैवी बाब आहे. असा टोला विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी लगावला आहे.