*कोकण Express*
*बनावट कुलमुखत्यारद्वारे खरेदीखत करणाऱ्या वैभववाडीच्या एकाला जामीन*
*आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले*
*प्रतिनिधी / कणकवली*
खातेदारांच्या ऐवजी बनावट व्यक्ती उभ्या करून बनावट कुलमुख्यत्यारपत्राच्या आधारे खरेदीखते केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या वैभववाडी तालुक्यातील गडमठ येथील विजय अनंत आडके याची येथील सह प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी १५ जार रुपयांच्या सशर्थ जामिनावर मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. दि. २५ नोव्हेंबर २०१० व १४ नोव्हेंबर २०११ या दिवशी सुधा आडके, विजय आडके (रा. गडमठ), सुवर्णा दत्ताराम शिंदे (रा. करुळ), शारदा गजानन घाग (रा. ओझरम) यांनी अन्य हिस्सेदारांना डावलून अन्य हिस्सेदार अन्नपुर्णा धूपकर ही नोव्हेंबर २०११ पूर्वी मयत असताना तिच्याऐवजी राजश्री शिवाजी रावराणे (रा. अचिर्णे) आणि प्रभावती काशिराम चव्हाण हिच्याऐवजी सुगंधा वसंत सावंत (रा. आचिर्णे) यांना उभे करून त्यांच्या नावचे खोटे रहिवासी दाखले, सरपंच सौ. प्र. प्र. मठकर यांच्याकडून घेतले. तसेच संबंधीत मुख्यत्यारपत्रावर तत्कालीन अन्य सरपंच रामचंद्र सुतार यांची ओळख म्हणून सही घेऊन तसेच दीपक जाधव (रा. कोकिसरे), राजेंद्र कांबळे (रा. कुसूर) यांची खरेदी खतावर ओळखीच्या सहया घेऊन फसवणूक केली म्हणून दशरथ नारायण राणे (रा. इंचलकरंजी) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार वैभववाडी पोलिसांत भादंवि कलम ४६७, ४६८, ४७१, ४२० सह ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी आरोपी विजय आडके याला अटक करण्यात आली होती. त्यावर झालेल्या सुनावणीनंतर आरोपीची १५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्तता करताना पोलिसांत हजेरी लावणे, तपासकामात ढवळाढवळ करू नये, अशा अटी घालण्यात आल्या आहेत.