*कोकण Express*
*कॉम्प्लेक्समधील नुतनीकरणप्रकरणी देवगड येथील बिल्डरची निर्दोष मुक्तता*
*आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले*
*प्रतिनिधी / कणकवली*
देवगड- सातपायरी येथील साहील प्राईड सी विंग या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील सदनिकाधारकाला बेकायदा, अनधिकृत लिफ्ट बांधकामास परवानगी दिली. त्यामुळे संबंधिताने केलेल्या अनधिकृत बांधकामामुळे इमारतीच्या झालेल्या नुकसानीबाबत व धोकादायक स्थिती निर्माण झाल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या विकासक शम्स अश्रफ खान यांची देवगड येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी निर्दोष मुक्तता केली. आरोपीच्यावतीने अॅड. उमेश सावंत यांनी काम पाहिले. याबाबत फिर्यादी व सदनिकाधारक शिवाजी भगवंत बडाख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सन २०१५ मध्ये विकासक व बिल्डर शम्स खान यांच्याकडून दुसऱ्या मजल्यावरील सदनिका खरेदी केली. ५ डिसेंबर ते १० डिसेंबर २०१७ या कालावधीत तिसऱ्या मजल्यावरील सदनिकाधारक राजेंद्रभाई परब याने फिर्यादीच्या सदनिकेच्या भिंतींना चिकटून लिफ्टचा बेकायदा सांगाडा उभारला व स्वत:साठी खासगी बेकायदा लिफ्ट तयार करून बाहेरून ड्रीलिंग केले. त्यामुळे इमारतीतील अनेक सदनिकांना हादरे बसून अनेक ठिकाणी भिंतीना लहान मोठ्या आकाराचे तडे गेले. त्यामुळे फिर्यादीच्या इमारतीचे सुमारे ५ ते ७ लाखांचे नुकसान झाले. याबाबत फिर्यादीने देवगड नगरपंचायतीकडे, जिल्हाधिकारी व नगररचनाकार कार्यालयाकडे पत्रव्यवहार केला असता लिफ्टसाठी कुणीही परवानगी घेतलेली नसल्याचे कळविण्यात आले. राजेंद्रभाई परब यांना विचारता त्यांना बिल्डरने लिफ्टसाठी लेखी संमत्तीपत्र दिल्याचे दाखविण्यात आले. त्यामुळे श्री. बडाख यानी दिलेल्या तक्रारीवरून राजेंद्रभाई परब व शम्स खान यांच्यावर भादंवि कलम ४२५, ४२७, ३३६, ५११, ३४ सह नगरपंचायत अधिनियम १८९ (९) व ३०० (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यानच्या कालावधीत राजेंद्रभाई परब यांचा मृत्यू झाला. सरकारपक्षातर्फे चार साक्षीदार तपासण्यात आले. साक्षीदारांच्या साक्षीतील तफावती, घटनास्थळ पंचनामा सिद्ध न होणे व सबळ पुरावा न आल्याने आरोपीची निर्दोष मुक्तता करण्यात आली.