*कोकण Express*
*पुन्हा एक दिवस हायस्कूलचा*
*३३ वर्षांनी पुन्हा एकदा शाळेत जमलेली भुईबावडा हायस्कूलची १९८९-९० ची दहावीची बॅच*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
भुईबावडा हायस्कूलमधील १९८९-९० च्या दहावीच्या बॅचने ३३ वर्षांनंतर ‘पुन्हा एक दिवस हायस्कूलचा’ अनुभवला. अगदी शाळेच्या प्रार्थनेपासून ते थेट वर्गातील धूमशानापर्यंतच्या सर्व गोष्टी करून या एका दिवसात या सर्वांनी आपले बालपण पुन्हा एकदा अनुभवले. आपल्या सर्व गुरुवर्यांचा सत्कार करून त्यांचे आशीर्वादही त्यांनी घेतले.
या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर उपस्थित गुरुवर्य के. बी. मालुसरे, डि. बी. दुकाने, श्री. केसरे, एम. एम. माने, भुईबावडा गावचे विद्यमान सरपंच तथा माजी विद्यार्थी बाजीराव मोरे यांच्यासह माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपण कितीही मोठे झालो, वेगवेगळ्या क्षेत्रात यशस्वी झालो तरी शालेय जीवनातील मौज काही वेगळी असते. आपली शाळा आणि शाळेतील ते सोनेरी दिवस कोणी विसरू शकत नाही; पण काळ कधी थांबत नाही. सरलेले दिवस पुन्हा येत नाहीत. तरीही भुईबावडा हायस्कूलच्या १९८९-९० च्या दहावीच्या बॅचने शाळेतील त्या आठवणी तब्बल ३३ वर्षांनी पुन्हा जागवल्या ‘एक दिवस हायस्कूलचा’ या उपक्रमाद्वारे. सहा महिन्यापूर्वी या बॅचच्या काही मित्र-मैत्रिणींचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला. अनेक मित्र-मैत्रिणी हळूहळू या ग्रुपमध्ये सहभागी होत गेले आणि ‘गेट टुगेदर’ची संकल्पना पुढे आली. दिवस ठरला रविवार, ८ मे.
_गुरुवर्यांचा सत्कार करण्यात आला_
त्या दिवशी सकाळपासूनच भुईबावडा हायस्कूलचे आवार या विद्यार्थ्यांनी फुलू लागले होते. दूर दूर गेलेले सर्व जण एकमेकांना भेटत होते. सर्वांच्या डोक्यावर मराठमोळा फेटा. हॉलच्या भिंतीसुद्धा विद्यार्थ्यांचा नावांनी कलात्मकरीत्या सजल्या होत्या. औक्षण करून आणि फुले उधळून शिक्षकांचे स्वागत करण्यात आले. या वेळी उपस्थित गुरुजनांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला.
काही विद्यार्थ्यानी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी जागवल्या. त्यानंतर शिक्षकांनीही या बॅचच्या आठवणी जागवून विद्यार्थ्यांना आशीर्वाद दिले. विद्यार्थ्यांनी या वेळी आपली ओळख करून देताना शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी भुईबावडा गावचे सरपंच तथा माजी विद्यार्थी बाजीराव मोरे, राकेश नारकर यांनी अथक परिश्रम घेतले.