*कोकण Express*
*स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कणकवलीत केंद्रीय समितीकडून तपासणी पूर्ण*
*नगरपंचायत कडून “थ्री स्टार” मानांकनासाठी प्रस्ताव*
*कणकवली ः प्रतिनिधी*
स्वच्छ सर्वेक्षण 2022 करिता कणकवली नगरपंचायत घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत केलेल्या उपाययोजना व कामकाजाची पाहणी “जीएफसी” (गार्बेज फ्री सिटी) टीम कडून नुकतीच पूर्ण करण्यात आली. कणकवली नगरपंचायत ने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केलेल्या कामाची यापूर्वी केंद्रस्तरीय दोन टीमकडून पाहणी करण्यात आली होती. या पाहणीचा अहवाल शासन स्तरावर पाठविण्यात येणार होता. त्यानंतर आता शेवटच्या टप्प्यात “गार्बेज फ्री सिटी” टीम कडून कणकवली शहरातील अन्य उपाययोजनां संदर्भात पाहणी करण्यात आली. शुक्रवार ते रविवार पर्यंत कणकवली शहरात फिरून या टीम ने पाहणी केली. यापूर्वी कणकवली शहरात स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत ओडीएफ व स्वच्छ सर्वेक्षण या दोन टीमने शहरात पाहणी केली होती. कणकवली शहराला मागील स्वच्छ सर्वेक्षण च्या वेळी टू स्टार मानांकन मिळाले होते. आता नगरपंचायत ने थ्री स्टार मानांकनासाठी प्रयत्न केले आहेत. चार सदस्य असलेल्या या केंद्र स्तरीय टीमकडून शहरातील सर्व प्रभागांना भेटी देण्यात आल्या. यावेळी शहरातील रस्ते, गार्डन, याचे फोटो घेण्यात आले. तसेच प्रत्येक प्रभागातील 50 लोकांकडून स्वच्छतेविषयी फीडबॅक देखील घेण्यात आले. कणकवली नगरपंचायतीने गार्बेज डेपो मध्ये केलेल्या उपाययोजनांची पाहणी करण्यात आली. तसेच नगरपंचायतीच्या मच्छी मार्केट मध्ये देखील या समितीने भेट घेत पाहणी केली. या सोबत शहरातील गटार, नाले, नदी ची देखील पाहणी या समितीच्या माध्यमातून करण्यात आली. मागील स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कणकवली नगरपंचायत चा देशाच्या पश्चिम विभागीय झोनमध्ये 67 वा क्रमांक आला होता. त्यानंतर आता पुन्हा नगरपंचायत ने याकरिता प्रयत्न केले आहेत. या अनुषंगाने कणकवली नगरपंचायत ने स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत गार्बेज डेपो मध्ये काही नव्याने उपाययोजना केल्या आहेत. येत्या काळात घनकचरा व्यवस्थापन करीता अजून काही नव्याने उपाययोजना देखील करण्यात येणार आहेत. त्यामुळे आता तिनही समित्यांकडून पाहणी झाल्यानंतर कणकवली नगरपंचायतचा स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कितवा क्रमांक येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

