*कोकण Express*
*जप्तीच्या नोटिसा बजावल्याने सतीश सावंतांवर टीका…*
*वैभव नाईक; रवींद्र चव्हाण यांनी जिल्हा बँकेत येऊन कारभाव पाहावा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
बोलेरो गाड्या खरेदी करणारे आणि या व्यवहारात जामीन राहणार्या राणेंच्या कार्यकर्त्यांना जिल्हा बँकेने जप्तीच्या नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमुळे जळफळाट झालेले राणेंचे कार्यकर्ते जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्यावर टीका करत आहेत असा आरोप आमदार वैभव नाईक यांनी आज केला.
श्री.नाईक म्हणाले, जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूवर भाजपनेते आणि कार्यकर्त्यांकडून सतीश सावंत यांच्यावर टीका केली जात आहे. खोटेनाटे आरोपही केले जात आहेत. मात्र असे आरोप करून जिल्हा बँकेची निवडणूक विरोधकांना कधीच जिंकता येणार नाही. तर जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचाच झेंडा फडकणार आहे. जिल्हा बॅकेवर टीका करणार्या भाजपच्या रवींद्र चव्हाण यांनीही जिल्हा बँकेत येऊन कारभार पाहावा आणि नंतरच भाष्य करावे.
ते म्हणाले, सन २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राणेंच्या कार्यकर्त्यांनी १३ बोलेरो गाड्या खरेदी केल्या होत्या. एकाच वेळी या गाड्यांची खरेदी झाल्याने निवडणूक आयोगाने या गाड्या जप्त करण्याचे निर्देश पोलिस प्रशासनाला दिले होते. त्यानुसार या सर्व गाड्या जप्त करण्यात आल्या. या गाड्यांसाठी जिल्हा बँकेकडून कर्ज उचल झाली असून राणेंचे कार्यकर्ते हेच या गाड्यांचे खरेदीदार आणि जामीनदार आहेत. गेल्या सहा वर्षात बोलेरो गाड्यांच्या कर्ज प्रकरणाची परतफेड न झाल्याने जिल्हा बँकेने कर्जदार आणि जामीनदारांना नोटिसा बजावल्या आहेत. या नोटिसांमुळे बिथरलेले राणेंचे कार्यकर्ते सतीश सावंतांना बदनाम करण्यासाठी टीका करत आहेत. मात्र कुणी कितीही टीका केली तरी शिवसेना सतीश सावंतांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे.