तिवरे शाळेने निर्माण केला एक नवा आदर्श

तिवरे शाळेने निर्माण केला एक नवा आदर्श

*कोकण Express*

*तिवरे शाळेने निर्माण केला एक नवा आदर्श*

*’विद्यार्थ्यांच्या कविता’ पुस्तक प्रकाशन प्रसंगी प्रांताधिकारी राजमाने यांचे प्रतिपादन*

*प्रशासकीय अधिकारी, साहित्यिक यांच्या उपस्थितीत कवितासंग्रहाचे प्रकाशन*

*कणकवली ः  प्रतिनिधी*

चांगले शिक्षक लाभले की चांगले विद्यार्थी घडतात. हे जरी खरं असलं तरी संस्कारक्षम शिक्षक लाभल्यावर तिवरे खालचीवाडी शाळेतील साहित्यक्षेत्रात चमकणारे विद्यार्थीही मिळतात, हे तिवरे शाळेतील ‘विद्यार्थ्यांचा कवितासंग्रह प्रकाशित झाल्यामुळे प्रत्ययास आले आहे. यातून तिवरे शाळेच्या विद्यार्थ्यांनी, गुणीजन शिक्षकांनी आणि ग्रामस्थांनी एक नवा आदर्श निर्माण केला असून मराठी साहित्यात ही अपवादाने घडणारी घटना आहे. या बालकवींच्या कविता सिंधुदुर्ग आकाशवाणीवर सादरण्यासाठी आपण प्रयत्न करू असे प्रतिपादन कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी तिवरे येथे केले.
तिवरे प्राथमिक शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांचा कवितासंग्रह प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे प्रकाशित करण्यात आला. त्याचे प्रकाशन तिवरे शाळेच्या पटांगणावर प्रसिद्ध कवी अजय कांडर यांच्या हस्ते करण्यात आले. जिल्हा उपशिक्षणाधिकारी रामचंद्र आंगणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रांताधिकारी राजमाने प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. यावेळी बोलताना प्रांताधिकारी राजमाने यांनी एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा चाळीस कवितांचा संग्रह प्रकाशित होण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच घटना असावी असा विश्वासही व्यक्त केला. यावेळी कास्ट्राईब संघटनेचे नेते किशोर कदम, विस्तार अधिकारी सुहास पाताडे, जुहीली सावंत, कवी संतोष महाडेश्वर, कवी सुरेश कुलकर्णी, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष रामदास आंबेलकर, सरपंच प्रमिला गुरव, भाई आंबेलकर काव्यसंग्रहाचे संपादक तथा मुख्याध्यापक विजय शिरसाट, संदीप कदम, विजय मेस्त्री, हेमंत राणे आदी उपस्थित होते.
श्री आंगणे म्हणाले, तिवरे खालचीवाडी शाळेचा संघर्ष मला माहित आहे. संच मान्यतेसाठी इथल्या जागृत ग्रामस्थांनी, शिक्षकांनी संघर्ष करून ही शाळा उभी राहिली आहे. यात मी माझ्या परीने योगदान देऊन शाळा अधिक प्रगतीपथावर जावी म्हणून प्रयत्न केला, आणि आज याच शाळेतील विद्यार्थ्यांचा कवितासंग्रह प्रकाशित होतो याचा मनस्वी आनंद होत आहे. एका प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचा संग्रह प्रकाशित होणे ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माझ्या माहितीप्रमाणे पहिलीच घटना आहे. याबद्दल तिवरे शाळेतील शिक्षक पालक आणि विद्यार्थी यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
कवी कांडर म्हणाले, तिवरे शाळेतील विद्यार्थ्यांच्या या कवितासंग्रहाची प्रकाशनापूर्वीच सोशल मीडियामुळे महाराष्ट्रातील मान्यवर साहित्यिकांनी दखल घेतली. हा संग्रह प्रकाशित होण्यासाठी या शाळेतील शिक्षक, शालेय समिती अध्यक्ष आंबेलकर आणि ग्रामस्थ यांनी जे योगदान दिले आहे त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच. तिवरे सारख्या एका खेडेगावातील विद्यार्थ्यांचा कविता संग्रह प्रकाशित होतो आणि त्याला वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि महाराष्ट्रातील साहित्यिक उपस्थित राहतात ही तिवरे गावची एक ऐतिहासिक घटना आहे. या विद्यार्थ्यांनी भविष्यात उत्तम कविता लिहावी बाकी त्यांनी साहित्यात पुढे जाण्याची जबाबदारी आपण स्वीकारू.चांगलं लिहिलं की आपोआप प्रसिद्धी मिळते. त्यासाठी खटपटी लटपटी करण्याची गरजच भासत नाही. तिवरे शाळेच्या विद्यार्थ्यांचा संग्रह प्रकाशित होऊन याचाच प्रत्यय आला आहे.
यावेळी कवी महाडेश्वर, कवी कुलकर्णी, किशोर कदम, सुहास पाताडे आदींनी विचार व्यक्त केले. यावेळी तिवरे शाळेच्या काव्यसंग्रहातील कवी श्रवण वाळवे, प्रणय वाळवे, गौरव परब, किरण चव्हाण, चैतन्य शिरसाट, रोशन वाळवे, समीक्षा गोसावी, योगिता पावसकर, समीक्षा चव्हाण, रिया परब, वैष्णवी सुतार आदींचा स्मृती पदक देऊन कवी महाडेश्वर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शिरसाट यांनी केले तर सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!