नवोदय परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विरोध करणार : भाजप तालुकाध्यक्ष चिंदरकर

नवोदय परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विरोध करणार : भाजप तालुकाध्यक्ष चिंदरकर

*कोकण Express*

*नवोदय परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना विरोध करणार : भाजप तालुकाध्यक्ष चिंदरकर*

*स्थानिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ देणार नाही*

*मालवण ः  प्रतिनिधी*

नवोदयच्या परीक्षेसाठी परजिल्ह्यातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सिंधुदुर्गात येत असल्याने स्थानिक मुलांवर अन्याय होत आहे. शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून परजिल्ह्यातील या मुलांची कागदोपत्री उपस्थिती दाखवत हा प्रकार केला जात असून मालवण तालुक्यात एकाही केंद्रावर परजिल्ह्यातील मुलांना परीक्षेस बसू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका भाजपने घेतली आहे. याबाबतची माहिती तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अनेक विद्यार्थी प्रविष्ट होत असतात. मात्र परजिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांचा नवोदय साठी नंबर लागतो आणि सिंधुदुर्गातील विद्यार्थी वंचित राहतात. मालवण तालुक्यातील एका शाळेमध्ये नवोदय विद्यालयात  वर्गात प्रवेशासाठी परजिलयातील पाल्यांचा  वर्गात खोटा प्रवेश दाखविल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकाराला सिंधुदुर्ग शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. काही शाळा परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांची कागदोपत्री उपस्थिती दाखवतात आणि हे विद्यार्थी केवळ पाचवीमध्ये जिल्ह्यातील शाळेत प्रवेश घेऊन नवोदय मध्ये प्रवेश घेत आहेत. या प्रकाराबाबत मालवण तालुका भाजपने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा शैक्षणिक गुणवत्तेत अग्रेसर असताना दुसरीकडे नवोदय साठी परजिल्ह्यातील विद्यार्थी असे काय निवडले जातात याबाबत संभ्रम असून मालवण तालुक्यात हे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. नवोदयच्या परीक्षेसाठी मालवण तालुक्यातून एकाही परजिल्ह्यातील विद्यार्थ्याला बसायलाच दिले जाणार नाही असा स्पष्ट इशाराच तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी दिला आहे. याची शिक्षण विभागाने दखल न घेतल्यास त्यानंतरच्या होणाऱ्या परिणामास शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र शासन जबाबदार राहील असा इशारा श्री चिंदरकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!