*कोकण Express*
*तर पंधरा दिवसांनंतर महामार्गाचे काम थांबवणार*
*कणकवलीतील विरोधी नगरसेवकांचा इशारा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरातून मुंबई – गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. मात्र महामार्गाच्या दोन्ही बाजूना प्राधिकरणाने हद्दीचे नीस लावलेले नाहीत. त्यामुळे बेकायदा बांधकामांचे पेव फुटले असून शहर बकाल होऊ लागले आहे. यासंदर्भात नगर पंचायत प्रशासन आणि महामार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करणार आहोत. पंधरा दिवसांत प्राधिकरणाने हद्दीचे निस न बसविल्यास महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा कणकवलीतील विरोधी गटाचे नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी दिला आहे.
शहरात मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात येत आहे. या कामादरम्यान अनेकदा वादविवादही झडले. मात्र शहरवासीयांनी विकासाच्या दृष्टिकोनातून सहकार्याची भूमिका घेतली. मात्र महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी सातत्याने गलथानपणा करीत आहेत. त्याचा फटका शहराच्या सौंदर्याला बसत आहे. त्याविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचे रुपेश नार्वेकर यांनी सांगितले.
महामार्गाच्या मध्य रेषेपासून दोन्ही बाजूला २२. ५ मीटर्स याप्रमाणे महामार्गाचे आरेखन आहे. त्याच्या हद्दी वर 25-25 मीटर अंतरवर (हायवेच्या नियंत्रण रेषे वर) हायवे प्राधिकरण ने निस पुरावेत. या हद्दीतील जमीन महामार्ग प्राधिकरण यांनी रीतसर खरेदी करून नुकसानग्रस्तांना भरपाई अदा केली आहे. मात्र हद्दीनंतर निस रोवलेले नसल्यामुळे बेकायदा बांधकामे सुरु झाली आहेत.
महामार्ग चौपदरीकरणात ज्यांच्या मालमत्ता गेल्या आणि ज्यांनी त्याची भरपाई घेतली ते देखील महामार्ग प्राधिकरण हद्दीत नव्याने बांधकामे करीत आहेत. त्यामुळे शहर बकाल होण्याची भीती आहे.
महामार्ग हद्दीच्या आरेखनाचे निस पंधरा दिवसांत बसवावेत, शहराचे जलस्रोत सुरक्षित आणि स्वच्छ असतील याची दक्षता घ्यावी, दोन्ही नद्यांच्या आत अनधिकृत बांधकाम होणार नाही, याची खबरदारी नगर पंचायतीने घ्यावी आणि तसा अहवाल सादर करावा, अशा आमच्या मागण्या आहेत. या मागण्यांसंदर्भात महामार्ग प्राधिकरण आणि नगर पंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला जाणार असून मागण्या मान्य न झाल्यास नागरिकांच्या साथीने तीव्र आंदोलन करून महामार्गाचे काम बंद पाडू, असा इशारा नार्वेकर यांनी दिला आहे.