*कोकण Express*
*भूमिपुत्रांच्या जमिनी हडप करणाऱ्या अधिकारी आणि दलालांची चौकशी करून कारवाई करावी…*
*शिवसेनेने वेधले जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे लक्ष*
*सिंधुदुर्गनगरी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमिनीच्या व्यवहारात बोगस कुळे उभी करून जिल्ह्यातील भुमिपूत्रांच्या जमिनी हडप करण्याची विकृती जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. यात काही अधिकारी आणि दलालांचा सहभाग आहे. तसेच या प्रकाराला काही राजकीय व्यक्तींचा वरद हस्त असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकाऱ्यांनी करत याकडे आज जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांचे लक्ष वेधले. तसेच भूमिपुत्रांच्या जमिनी हडप करणाऱ्या अधिकारी आणि दलालांची चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोगस कुळे उभी करून जिल्ह्यातील भूमिपुत्रांच्या जमिनी हडप करण्याची विकृती जिल्ह्यात झपाट्याने वाढत आहे. असाच प्रकार सावंतवाडी तालुक्यासह काही तालुक्यात घडल्याचे समोर आले असून तशी अनेक प्रकरणे आता उघडकीस येत आहेत. कामानिमित्त गावाबाहेर राहणाऱ्या नागरिकांची माहिती मिळवून अशा नागरिकांच्या जमिनीत महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी बोगस कुळ दाखवून त्यांच्या जमिनी हडप करत आहेत. यात काही राजकीय पुढाऱ्यांचा वरदहस्त असल्याचा आरोप शिवसेना कार्यकर्त्यांनी केला आहे. असे प्रकार जिल्ह्यात वाढत असल्याने या प्रकाराला आळा बसणे आवश्यक आहे. यासाठी आज शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांची भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते, उपजिल्हा प्रमुख अमरसेन सावंत, नागेंद्र परब, रुपेश राऊळ, अशोक सावंत, चंद्रकांत कासार आदी उपस्थित होते. यावेळी भूमिपुत्रांच्या जमिनी हडप करणाऱ्या अधिकारी आणि दलालांवर चौकशी करून कारवाई करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.