*कोकण Express*
*सरिता पवार यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर*
*नागसेन शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली संस्थेने जाहीर केला पुरस्कार*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली तालुक्यातील माईन नं 1 च्या सहाय्यक शिक्षिका तथा प्रसिद्ध कवयित्री, लेखिका सरिता पवार यांना नागसेन शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली चा राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. आमदार संजय केळकर यांच्या हस्ते सोमवार 15 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता एस.डी. पेडणेकर इंग्लिश मिडीयम स्कुल लोरे नं 2 येथे पुरस्कार वितरण केले जाणार आहे. यावेळी संस्थासंचालक प्रा. नागेश कदम, प्रा. डॉ.सोमनाथ कदम, सिनेकलाकार निलेश पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संयुक्त जयंती महोत्सवही साजरा केला जाणार आहे. शैक्षणिक, सामाजिक आणि साहित्य क्षेत्रातील योगदान लक्षात घेत हा मानाचा राज्यस्तरीय पुरस्कार राज्यातील एका शिक्षिकेला दरवर्षी संस्थेच्या वतीने देण्यात येतो. यावर्षी हे पुरस्काराचे सातवे वर्ष आहे.
याआधी आपल्या जिल्ह्यातील प्रसिद्ध ज्येष्ठ लेखिका वृंदा कांबळी आणि लेखिका तथा माजी उपप्राचार्या तरुजा भोसले याना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.
पेशाने प्राथमिक शिक्षिका असलेल्या कवयित्री सरिता पवार या मागील 22 वर्षांपासून साहित्यलेखन करत असून त्यांच्या अनेक कविता कथाना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. आपल्या 20 वर्षांच्या शैक्षणिक कारकिर्दीत सरिता पवार यांनी आदर्श युवा पिढी घडविण्यासाठी विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मेहनत घेतली. भारतीय संविधानाच्या समता, बंधुता आणि एकात्मता ही तत्वे बालपणापासून मुलांच्या मनावर बिंबवण्यासाठी साने गुरुजींच्या राष्ट्रसेवा दल मार्फत बालशिबीरे आयोजित करून मुलांच्या मनावर सुसंस्कार घडवण्याचे कार्य त्या अविरत करत आहेत. सरिता पवार यांच्या या शैक्षणिक, सामाजिक, साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेत नागसेन शिक्षण प्रसारक मंडळ डोंबिवली ने राज्यस्तरीय क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर केला आहे. सरिता पवार यांना यापूर्वी अनेक राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल सरिता पवार यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.