*कोकण Express*
*दोनदा मुदतवाढ देऊनही साटेली-भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अपूर्ण ; डॉ. अनिशा दळवी..*
*दोडामार्ग ः प्रतिनिधी*
दोनदा मुदतवाढ देवूनही साटेली भेडशी प्राथमिक आरोग्य केंद्राचे काम अद्याप अपूर्ण आहे. आरोग्य केंद्राच्या दोन इमारतीमधील एका इमारतीचे सत्तर टक्के तर दुसऱ्या इमारतीचे काम पन्नास टक्के पूर्ण असल्याची कबुली बांधकामाची पाहणी करण्यासाठी आलेल्या राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे उपअभियंता आकाश फेरे आणि शाखा अभियंता बी. पी. पाटील यांनी माजी शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिशा दळवी यांच्यासमोर दिली.
ठेकेदाराचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरु असल्याने आंतररूग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची जागेअभावी हेळसांड होते. त्यामुळे वस्तुस्थिती दर्शक अहवाल वरिष्ठांना देवून संबंधित ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याची कार्यवाही करावी अशी मागणी डॉ. दळवी यांनी केली.
श्री. फेरे आणि पाटील यांनी आज आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यावेळी डॉ. दळवी यांनी त्यांची भेट घेवून चर्चा केली.
तीन वर्षापासून इमारतीचे काम सुरू आहे. मुख्य इमारतीची रंगररंगोटी केल्याने काम पूर्ण झाल्यासारखे वाटते;पण अद्याप तीस टक्के काम अपूर्ण आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या इमारतीचे काम तर पन्नास टक्के अपूर्ण आहे. याच कामासोबत मंजूर झालेल्या सांगेली येथील आरोग्य केंद्राचे काम मात्र पूर्ण झाले आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे.
दरम्यान, डॉ. दळवी यांनी जुन्या इमारतीच्या व्हरांड्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांचे हाल श्री फेरे यांना दाखवले. ग्रामीण भागातील लोकांचे हाल बघवत नाहीत म्हणून आपण इमारतीचे काम वेळेत पूर्ण व्हावे अशी मागणी करत होते असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य समितीने ७ मार्चला घेतलेल्या ठरावानुसार या ठेकेदाराला काळया यादीत टाकून दुसऱ्या ठेकेदाराकडून काम करून घ्या अशी सूचनाही त्यांनी श्री. फेरे व पाटील यांना केली. आरोग्य समितीचा तो ठराव आमच्या अहवालासोबत वरिष्ठांना पाठवला जाईल, त्यानुसार ते ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याचा निर्णय घेतील असे त्या दोघांनी सांगितले. त्यावर डॉ. दळवी यांनी धिम्या गतीने सुरू असणारे काम आणि त्यामुळे आजूबाजूच्या शेकडो रुग्णांची होणारी गैरसोय त्या अहवालात नमूद करा असे सांगितले.

