फोंडाघाटात अल्टो कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात, दोन्ही वाहने सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळले

फोंडाघाटात अल्टो कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात, दोन्ही वाहने सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळले

*कोकण Express*

*फोंडाघाटात अल्टो कार आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात, दोन्ही वाहने सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळले*

*फोंडाघाट ः प्रतिनिधी*

फोंडाघाट  बाजारपेठेपासून सुमारे १० किमी अंतरावर फोंडा घाटामध्ये अल्टो कार ला चिरे वाहतूक करणाऱ्या ट्रक ची जोरदार धडक बसून कार सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळली आणि त्यापाठोपाठ ट्रक ही त्या कार वर कोसळला. या भीषण अपघातात आश्चर्यकारक रित्या अल्टो कार चालक आणि ट्रक चालक व आतील प्रवासी बचावले असून ट्रक मधील माणसांना किरकोळ दुखापत वगळता सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र दोन्हीही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान याबाबत सविस्तर वृत्त असे की अल्टो कारचालक रणजित  बाळासो भांडवले. वय ३१ वर्षे हे राज्य सरकारच्या स्थानिक लेखापरीक्षण च्या वित्त विभागामध्ये सिंधुदुर्ग नगरी येथे नोकरीला असून त्याची नुकतीच डेपुटेशन वरती रत्नागिरीला बदली झाल्याने आधी आपल्या गावी मुरगुड भडगाव, ता. कागल,कोल्हापूर येथे असलेल्या पत्नी आणि लहान मुलीस भेटण्यासाठी आज सकाळी १० वाजता ओरोस वरून निघाले असताना फोंडाघाट बाजारपेठ पासून १० किमी अंतरावर घाटामध्ये एका धोकादायक वळणावर आले असता  देवगड येथे चिरे भरण्यासाठी ट्रक चालक मोहम्मद बापूसो मुजावर.वय ५५ वर्षे रा.कागल,कोल्हापूर हे आपल्या ताब्यातील ट्रक भरधाव वेगाने देवगडच्या दिशेने घेऊन येत असताना या धोकादायक वळणावर ट्रक ची अल्टो कार जोरदार धडक लागून अल्टो सुमारे ५० फूट खोल दरीत फेकली गेली आणि दोन दगडांच्या मध्ये राहिली त्यापाठोपाठ ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक ही दरीत अल्टो कार वर जाऊन कोसळला.सदरची घटना आज सकाळी ११.४५ दरम्याने घडली.
देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय
आज झालेला ट्रक आणि अल्टो कारची भीषणता पाहता अल्टो कार ट्रक खाली पूर्णपणे चिरडलेली दिसत असून या भीषण अपघातातून वाचणे हे अशक्यच असे वाटावे असे अपघातस्थळी चित्र असून अल्टो कार चालकाने लावलेल्या सीट बेल्ट मुले आणि दोन दगडामध्ये कार राहिल्याने वरून कार वर ट्रक पडून सुद्धा अल्टो कारमधील कार चालक नशीब बलवत्तर म्हणून सुरक्षित राहिले.
त्याचबरोबर ट्रक चालक मोहम्मद बापूसो मुजावर ट्रक मध्ये सोबत असणारे प्रवासी सुभाष शिवाजी देसाई.वय ४५ वर्षे, रा.मसवे ,भुदरगड व दत्तात्रय बापूराव देसाई .वय६५ वर्षे,रा.मसवे,भुदरगड हेसुद्धा ट्रक बरोबर ५० फूट खोल दरीत कोसळूनही किरकोळ जखम वगळता कोणतीही गंभीर हानी झाली नाही.
अपघातानंतर अल्टो कारचालक रणजित भांडवले सीटबेल्ट सोडवून कारच्या खिडकीतून  बाहेर पडत ५० फूट खोल दरीतून वर चढत रस्त्यावर येऊन थांबले त्या पाठोपाठ ट्रक चालक आणि दोन्ही प्रवासी  स्वतःहून दरीतून वर चढत रस्त्यावर आले .
सदर  अपघाताची खबर महामार्ग पोलिसांना कळताच महमार्गचे पोलीस हेडकॉन्स्टेबल अण्णा घारकर, दिलीप पाटील,प्रकाश गवस,सुनील निकम कणकवली पोलीस शिपाई सागर मसाळ आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींची विचारपूस करत किरकोळ जखमींना स्थानिकांच्या मदतीने दाजीपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविले तोपर्यंत कणकवली पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस उपनिरीक्षक खरात यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला.

बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षपणा

फोंडाघाट मार्गे वाढती अवजड वाहनांची वाहतूक पाहता घाटातील रस्त्याना मजबूत साईड कठडे बांधणे गरजेचे असताना कित्येक धोकादायक वळणांवर साईड कठडेच नसून अशी वळणे खूप धोकादायक झाली आहेत .आज झालेला अपघात यानंतर सुमारे ५० फूट खोल दरीत कोसळलेली वाहने पाहता या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली असती तर बांधकाम विभागावरच गुन्हा दाखल करावा लागला असता.दरवर्षी घाटातील रस्ते दुरुस्तीवर लाखो रुपये खर्च करणारे बांधकाम विभाग संरक्षण कठडे कधी बांधणार असा प्रश्न वाहन चालकांकडून विचारला जात आहे.
वाहतूक पोलीस अधिकाऱ्यांच्या वरदहस्ता खाली चाललेली ओव्हरलोड चिरे वाहतूक अपघातास कारणीभूत ?
देवगड वरून बहुतेक चिरा हा घाटमाथ्यावरच विकला जात असून या वाहतुकीसाठी दरदिवशी सुमारे ८० ते ९० ट्रक  चिरे वाहतूक करत असतात मात्र हे चिरे वाहतूक होत असताना मसुलच्या डोळ्यात धूळ फेक करत पास पेक्षा जास्त चिरा गाडीत भरतातच पण काही ट्रक चालकांच्या म्हणण्यानुसार रस्ते वाहतूक अधिकारी,वाहतूक पोलीस  आणि चेक नाके याना दर महिन्याच्या इन्ट्री देऊन ? छातीठोक पणे ओव्हरलोड वाहतूक केली जाते यातूनच सध्या फोंडाघाट मार्गावर अपघातांची मालिका सुरू झाली आहे.आज झालेला अपघातही या कारणांमुळे झाला आहे.ट्रक मधील बसलेल्या प्रवाशांच्या म्हणण्यानुसार ट्रक चालकाच हायगयीने ट्रक चालवत असल्याने अपघात घडला.ट्रक चालकास देवगड येथे चिरे भरण्यासाठी नंबर लावण्याची घाई असल्याने हा अपघात घडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!