महामार्गावरील वागदे गावातील दुसरी मार्गिका सुरू करा

महामार्गावरील वागदे गावातील दुसरी मार्गिका सुरू करा

*कोकण Express*

*महामार्गावरील वागदे गावातील दुसरी मार्गिका सुरू करा…*

*ग्रामस्थांची मागणी ; प्रांताधिकाऱ्यांना दिले निवेदन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

मुंबई-गोवा महामार्गावरील गोपुरी आश्रम ते गडनदी या दरम्‍यानची एक मार्गिका बंद आहे. ती तातडीने सुरू करावी जेणे करून येथे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणता येणे शक्‍य होईल अशी मागणी वागदे ग्रामस्थांनी केली आहे. याबाबतचे निवेदन ग्रामस्थांनी आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले.

जमीन मोबदला न मिळाल्‍याने मुंबई गोवा महामार्गावरील वागदे गावातील गोपुरी आश्रम ते गडनदीपर्यंतचे काम स्थानिकांनी बंद पाडले होते. मात्र येथील जागेच्या भूसंपादनाच्या नोटिसा संबंधित जमीन मालकांना १७ फेब्रुवारी रोजी देण्यात आल्‍या आहेत. या नोटिसीमध्ये संबधितांना तत्‍काळ मोबदला देण्यात येईल असेही नमुद करण्यात आले आहे. त्‍यामुळे पुढील दहा दिवसांत संबधितांना मोबदला अदा करा आणि बंद असलेली दुसरी मार्गिका खुली करा अशी मागणी वागदे गावचे माजी सरपंच संदीप सावंत यांच्यासह गोविंद घाडीगावकर, समीर प्रभुगावकर, श्रीधर घाडीगावकर, भाई काणेकर, दीपक घाडीगावकर, सूर्यकांत घाडीगावकर, दिलीप सावंत आदींनी केली. तसेच याबाबतचे निवेदनही या सर्वांनी आज प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिले.

वागदे प्रमाणे जानवली गावातही भूसंपादनाची नोटिस न मिळाल्‍याने तेथील सेवा रस्त्याचे काम स्‍थानिकांनी गेली तीन वर्षे अडवून ठेवले होते. मात्र जमीन मालकांना भूसंपादनाची नोटिस दिल्‍यानंतर महामार्ग विभागाने येथील सेवा रस्त्याचे काम तातडीने सुरू केले. त्‍याच धर्तीवर वागदेतील जमीन मालकांना तातडीने मोबदला अदा करून येथील रस्ता खुला करावा अशी मागणी माजी सरपंच संदीप सावंत यांनी केली. सध्या खारेपाटण ते झाराप या दरम्‍यानच्या महामार्गावर फक्‍त गोपुरी आश्रम ते गडनदी एवढ्याच भागात एकाच मार्गिकेवरून वाहने ये जा करत आहेत. त्‍यामुळे सतत अपघात होत असल्‍याचेही श्री.सावंत म्‍हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!