*कोकण Express*
*सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील विकास कामांसाठी २ कोटी ११ लाखाचा निधी मंजूर…*
*दीपक केसरकरांचा मुख्यमंत्र्यांसह सामाजिक न्याय विकास मंत्र्यांकडे यशस्वी पाठपुरावा…*
*शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांची माहिती*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांसाठी २ कोटी ११ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह सामाजिक न्याय विकास मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पाठपुरावा केला होता. याबाबतची माहिती शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून दिली आहे.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की, श्री.केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सन २०२१-२२ अंतर्गत सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग या तिन्ही तालुक्यासाठी मिळून २ कोटी ११ लाख एवढा मोठा निधी विविध विकास कामांसाठी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून तिन्ही तालुक्यातील ३२ विकास कामे केली जाणार आहेत. तर केवळ सावंतवाडी तालुक्यासाठी यातील १ कोटी २७ लाख रूपये निधी खर्च होणार आहे. हा निधी पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या सहकार्याने आणि श्री. केसरकर यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झाला आहे, असे म्हटले आहे.