*कोकण Express*
*वसुंधरा विज्ञान केंद्र, नेरूरपार येथे वैज्ञानिक सहल*
वसुंधरा विज्ञान केंद्र गेली सत्तावीस वर्षे सिंधुदूर्ग जिल्ह्यामधील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून फिरते ज्ञान विज्ञान प्रकल्पाच्या माध्यमातून विविध विज्ञान उपक्रम राबवित आहे. त्याचा फायदा ग्रामीण भागातील शाळा ज्या ठिकाणी अद्ययावत प्रयोगशाळा उपलब्ध नाहीत असा शाळांमधील विद्यार्थ्यांना होत आला आहे.
दरवर्षी सुमारे १५० शाळांमधून हा विज्ञान कार्यक्रम राबविला जात आहे. परंतु अतिदुर असणाऱ्या गावातील शाळांमध्ये हा कार्यक्रम पोहोचत नाही त्यामुळे तेथील विद्यार्थी विज्ञान अभ्यासक्रमातील प्रात्यक्षिकापासून वंचित राहतात. परंतु ज्या दूरच्या गावात वसुंधराच्या फिरत्या विज्ञान प्रयोगशाळेला पोचणे शक्य नाही अशा गावातील ग्रामविकास मंडळानी ओझरम सेवा मंडळ, मुंबई यांचा आदर्श लक्षात घेऊन अशा प्रकारच्या वैज्ञानिक सहलींचे वसुंधरामध्ये आयोजन करावे असे आवाहन ओझरम सेवा मंडळ, मुंबई यांनी केले आहे.
कारण सदर प्रयोगांचे इयत्तावार प्रात्यक्षिक संच वसुंधरा विज्ञान केंद्रात उपलब्ध आहेत. ओझरम, कणकवली जिल्हा परिषद शाळा क्रमांक १ येथील इयत्ता ५वी, ६वी आणि ७ वी च्या विद्यार्थ्यांकरिता ओझरम सेवा मंडळ, मुंबई यांच्यावतीने नुकतीच एक दिवसाच्या वैज्ञानिक सहलीचे आयोजन वसुंधरा विज्ञान केंद्रात करण्यात आले होते. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना त्यांच्या विज्ञान अभ्यासक्रमातील सर्व प्रयोग दाखविण्यात आले व त्यांना स्वतःही करता आले. तसेच मॉडेलच्या माध्यमातून गणिताच्या संकल्पना, सायन्स पार्क, विज्ञान केंद्रातील इतर उपक्रमांची माहीती आणि 3D सायन्स फिकशन मूव्ही द्वारे प्रत्यक्ष वेगळा अनुभव घेता आला. असा भरगच्च कार्यक्रम विज्ञान केंद्र मध्ये करण्यात आला. वसुंधरा येथील उपलब्ध असलेल्या सर्व शैक्षणिक सुविधांचा भविष्यात सर्वांनी आपापल्या गावातील विद्यार्थ्यांसाठी लाभ घ्यावा.असे आवाहन ओझरम सेवा मंडळ, मुंबई यांचे अध्यक्ष महादेवराव राणे व सचिव प्रथमेश राणे यांनी केले आहे