*कोकण Express*
*पारकर यांनी शिवसेनेने निधी दिल्याचा कांगावा करून स्वतःची पाठ थोपटून घेउ नये*
*राजकारणात जिवंत राहण्यासाठी संदेश पारकर यांची धडपड*
*कणकवली ः प्रतिनिधी*
निवडणुकीपूर्वी शिवसेनेकडून जशी आश्वासने दिली जातात तशीच आश्वासने कोणताही अभ्यास न करता व आकडेवारीची माहिती न घेता संदेश पारकर यांच्याकडून दिली जात आहेत. कणकवली शहरावर बोलत असताना थेट राज्याच्या प्रश्नावर बोलून मारुती उडी मारण्याचे काम पारकर यांच्याकडून केले जात आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. तर केंद्रात एनडीएचे सरकार आहे. महाविकासआघाडी मध्ये एकटी शिवसेना नाही तर काँग्रेस व राष्ट्रवादीचे ही महत्त्वाचे योगदान आहे. कणकवली नगरपंचायत ला उपलब्ध झालेल्या निधी मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, यांच्याकडूनही तेवढेच प्रयत्न झालेले आहेत. राज्यात सत्तेत सहभागी असलेले राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत आमच्यासोबत सत्तेत सहभागी असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक नाईक यांचाही निधी आणण्यामध्ये वाटा आहे. त्यामुळे पारकर यांनी शिवसेनेने निधी दिल्याचा कांगावा करून स्वतःची पाठ थोपटून घेउ नये अशी टीका कणकवली उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी केली.
नगराध्यक्ष दालनात पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष बंडू हर्णे बोलत होते. यावेळी गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक मेघा गांगण, अॅड.विराज भोसले, शिशिर परुळेकर, महेश सावंत आदी उपस्थित होते.
पारकर यांनी कणकवलीतील क्रीडांगणासाठी ४ कोटींचा निधी आणल्याचे जाहीर केले आहे. त्यात तथ्य असेल तर पारकर यांनी त्या चार कोटीच्या मंजुरीचे आदेश दाखवावेत अन्यथा राजकारणातून निवृत्ती घ्यावी व कणकवलीतील जनतेची माफी मागावी व कालच्या पत्रकार परिषदेच्या तारखेपूर्वीचे आदेश दाखवले तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन असे आव्हान उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिले. नगरपंचायतीच्या ताब्यात जागा आली नसताना १ कोटी रुपये खर्च करून श्रीधर नाईक उद्यान कसे बांधणार? असलेली जागा बहुतांशी प्रमाणात महामार्ग चौपदरी करण्यात गेली आहे. नवीन उद्यान करण्यासाठी भूसंपादन करण्याची गरज आहे. व याचा प्रस्ताव नगरपंचायत कडून जावा लागतो. पारकर सांगून अशी कामे होत नाहीत. असा टोला हर्णे यांनी लगावला
हर्णे म्हणाले, राजकीय क्षेत्रात स्थान राहिले नसल्याने, संदेश पारकर हे भूलथापा मारून प्रसिद्धीचा हव्यास पूर्ण करून घेत आहेत. तसेच अर्धवट माहितीच्या आधारे कोट्यवधी निधीच्या घोषणा करत आहेत. कणकवली शहरातील क्रीडांगणाच्या विकासासाठी कणकवली नगरपंचायतीने २८ कोटींचा निधी मागितला होता. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी ४ कोटी निधी देण्याची ग्वाही दिली होती. मात्र गेल्या वर्षभरात क्रीडांगणाच्या विकासासाठी एक रुपयाचाही निधी आलेला नाही.
संदेश पारकर यांनी सर्वच बाबतीत राजकारण केले. मात्र त्यांनी आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत राजकारण करू नये. १ कोटी रुपयांत भव्य स्मारक करण्याच्या गोष्टी करणाऱ्या पारकर यांनी त्यापूर्वी त्या संदर्भाची पार्श्वभूमी समजून घ्यायला हवी. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अरबी समुद्रामध्ये प्रस्तावित असलेले छत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे गेल्यानंतर ही प्रक्रिया पुरी झाली. मात्र पुतळा उभारणीसाठी आजही यश आलेले नाही. अशा स्थितीत जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या जागेत छत्रपतींचे स्मारक करण्याच्या बाता पारकर मारताहेत. मात्र ती जागा यापूर्वीच गावठी आठवडा बाजारासाठी देण्यात आली आहे. त्यामुळे पार्श्वभूमी जाणून घेतल्याशिवाय पारकर यांनी पोकळ घोषणा करू नये.
पारकर हे कणकवलीचे नगराध्यक्ष होते. त्यांना भूसंपादन प्रक्रिया, प्रशासकीय मान्यता, नगरपंचायतीचे ठराव आदींबाबतची माहिती असायला हवी होती. पण कोणतीही माहिती न घेता ते कोट्यवधीची उड्डाणे करत आहेत असेही हर्णे म्हणाले.
२०१८ – २०१९ मध्ये ३ कोटी ४३ लाख तर २०१९ – २०२० मध्ये ७ कोटी ६ लाख असा एकूण १२ कोटींचा निधी नगरपंचायतला प्राप्त झाला आहे. मात्र याबाबत कोणतीच माहिती न घेता पारकर यांनी श्रेयासाठीच ६ कोटीची आकडेवारी जाहीर करून टाकली. मुळात हा निधी राज्यस्तरावरून प्रत्येक नगरपालिकांना देण्यात येतो. त्याचे समान वाटपही केले जाते. त्यामुळे सरसकट होणाऱ्या निधी वाटपाचे ही श्रेय पारकर यांनी घ्यावे ही पण एक आश्चर्याचीच बाब आहे. निवडणूक तोंडावर असताना अशा घोषणा करून भाषणे करतात तसेच भाषण पारकर यांनी काल केले. मात्र कदाचित त्यांच्या लक्षात नसावे की निवडणूक कणकवली नगरपंचायत ची नाहीतर वैभववाडी ची आहे. त्यांनी अशी भाषणे वैभववाडी येथे करावी असा टोला उपनगराध्यक्ष यांनी लगावला. कणकवली शहराच्या क्रीडांगणासाठी संदेश पारकर व आमच्या विरोधकांना किती आस्था आहे त्याचा पुरावा सादर करत असल्याचे बंडू हर्णे यांनी सांगितले. २५ जानेवारी २०२० रोजी कणकवली शिवसेना शहर प्रमुख शेखर राणे यांनी क्रीडांगणाचे आरक्षण उठविण्यासाठी उपोषण छेडण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्ह्याधिकाऱ्यांनी कणकवली मुख्याधिकार्यांना पत्र दिले होते. या पत्रात सदरच्या आरक्षण उठविण्यात बाबत सूचना दिल्या होत्या. त्यावर सत्ताधारी म्हणून आम्ही सदरचे आरक्षण उठवता येणार नाही. कणकवली शहरातील तरुणांच्या दृष्टीने क्रीडांगण होणे महत्त्वाचे असल्याने टप्प्याटप्प्याने आरक्षण विकसित करण्याचे आम्ही ठरविले असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. त्यामुळे पारकर यांची दुटप्पी भूमिका व अडाणीपणा यातून दिसून येतो. एकीकडे पारकर यांनी अशी भूमिका घेणे आम्ही समजू शकतो. मात्र विरोधी गटनेते सुशांत नाईक यांना मात्र या साऱ्या प्रकाराची जाणीव हवी. तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सूचनेनुसार २५० गुंठे क्रीडांगणाचे आरक्षण संपादन करण्यासाठी प्रस्ताव करण्यात आला होता. यावेळी सुशांत नाईक यांनाही आम्ही सदर आरक्षण संपादनासाठी निधीची मागणी करण्यासाठी पाठपुरावा करण्यास सांगितले होते. यावेळी २८ कोटींचा निधी मागितला होता. त्यानंतर ३ कोटी ६२ लाख नियोजन मधून नगरपंचायतीच्या इतर कामांना उपलब्ध झाले. परंतु सुशांत नाईक यांनी मागणी करूनही तत्कालीन पालकमंत्र्यांनी क्रीडांगणाच्या आरक्षण साठी निधी दिलेला नाही. त्यामुळे आताचे व तत्कालीन पालकमंत्री एकवेळ आमच्यासोबत दुजाभाव करत नसतील मात्र त्यांनी सुशांत नाईक यांच्या बाबतीत मात्र निश्चित दुजाभाव केल्याचा टोला बंडू हर्णे यांनी लगावला. पालकमंत्र्यांनी निधी दिला की त्यातून शिवसेनेचे नगरसेवक सुचवतील ती कामे करण्यात येणार अशा भेकड धमक्या पारकर यांनी आम्हाला देऊ नये. कणकवली शहरातील कोणतेही विकास कामे नगरपंचायत ठराव करून नगरपंचायत कडून प्रस्ताव घेऊनच केले जाते. त्याची माहिती अगोदर पारकर यांनी घ्यावी. पारकर यांच्या व्याख्येप्रमाणे हायवे प्रश्न गंभीर भूमिका घेणे म्हणजे उपोषण करणे. उपोषण करणे हे गंभीर भूमिकेत येते का असा सवालही त्यांनी केला. अशीच वक्तव्य जर करायची होती तर श्री पारकर यांनी त्यांच्या नगरसेवक असलेल्या बंधूंना तरी पत्रकार परिषद घ्यायला सांगायची असा टोला हर्णे यांनी लगावला