*कोकण Express*
*”पाठीवरती हात ठेवुन फक्त लढ म्हणा…!!”-अनुपम कांबळी*
देवगड शहर हा गेली कित्येक वर्षे भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. माजी आमदार कै.अप्पासाहेब गोगटे, त्यानंतर त्यांचे पुतणे माजी आमदार अजितराव गोगटे या सर्वांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांची पाळेमुळे देवगडात खोलवर रुजवली आहेत. त्यात करून २०१९ सालच्या विधानसभा निवडणुकीत आमदार नितेश राणेंनी भाजप पक्षात प्रवेश केल्यामुळे अगोदरच मजबुत असलेल्या देवगड शहरातील भाजपची ताकद कित्येक पटींनी वाढली.
जेव्हा सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी आणि देवगड या चार नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या, तेव्हा देवगड नगरपंचायत निवडणुक शिवसेना नेत्यांनी ऑप्शनला ठेवली होती. याठिकाणची भाजपची तटबंदी तुटणारी नसल्याने शिवसेनेचा कोणताही नेता देवगडमध्ये प्रचारासाठी उत्सुक नव्हता, ही वस्तुस्थिती आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीत देवगड नगरपंचायत निवडणुकीत पक्षाच्या प्रचाराचे शिवधनुष्य संदेश पारकर यांनी उचलले. पुढच्या महिनाभरात त्यांनी प्रचाराचा असा काही धुरळा उडवला त्यात शिवसेनेचे आठ आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचा एक असे एकुण नऊ नगरसेवक निवडुन आलेत. भाजपला सत्तेतून पायउतार व्हावे लागले. देवगड नगरपंचायतीत शिवसेनेचा नगराध्यक्ष विराजमान झाला. यात संदेश पारकर यांचा वाटा सिंहाचा होता.
दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र राज्याचे पर्यटन मंत्री नामदार आदित्य ठाकरे देवगडमध्ये आले असता, त्यांनी शिवसेनेच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यावेळी संदेश पारकर यांनी त्यांना खुर्चीत बसण्याची विनंती केली असता, आदित्य ठाकरे त्यांना म्हणाले की- “संदेश भाई, तुम्ही शत्रुच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचा भगवा मानाने फडकवला आहे. त्यामुळे या खुर्चीवर बसण्याचा पहिला मान फक्त तुमचाच आहे.” अशा प्रकारे आदित्य ठाकरेंनी देवगड नगरपंचायत निवडणुकीत पक्षाच्या विजयासाठी जीवाचे रान करणाऱ्या संदेश पारकरांसारख्या शिवसैनिकाचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान केला.
शिवसैनिकांना आणखीन काय पाहिजे असते…?? सर्वोच्च नेत्यांकडून कौतुकाची थापच तर हवी असते…!!
आदित्य ठाकरेंनी दिलेली ही कौतुकाची थाप पुढची कित्येक वर्षे संदेश पारकरांंना अशाच प्रकारे चिरंतन ऊर्जा देत राहिल.
संदेशभाई आगे बढो