*कोकण Express*
*फोंडाघाट महाविद्यालयात क्रीडा महोत्सव संपन्न*
*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*
येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालय फोंडाघाटचा वर्ष 2021/ 22 चा वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न झाला. तीन दिवस चाललेल्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश कामत यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की जीवनाला नियमबद्धतेत बांधण्याचे काम क्रीडाक्षेत्र करते. प्रत्येक खेळाचे नियम स्वतंत्र असतात. आणि त्या नियमात राहूनच आपल्याला खेळावे लागते. एकदा का नियम पाळण्याची सवय लागली की दैनंदिन जीवनातही आपण नियमात वागतो. आणि शिस्तबद्ध माणूस घडतो.
क्रीडाविभाग प्रमुख प्राध्यापक जगदीश राणे म्हणाले की कोविडच्या दीर्घ विश्रांतीनंतर आपण खेळ सुरू करत आहोत. खेळ हे खिलाडूवृत्तीने खेळले गेले पाहिजेत. हार-जीत यापेक्षा चांगल्या प्रतीची खिलाडूवृत्ती लक्षात राहते. कोणतेही वाद न घालता आपण या महोत्सवाचा आनंद घेऊया. असे आवाहन केले.
या महोत्सवात धावणे 100/ 200 मीटर धावणे, थाळीफेक, भालाफेक, बुद्धिबळ, कॅरम, कबड्डी, व्हॉलिबॉल हे क्रीडाप्रकार घेण्यात आले. विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. विद्यार्थ्यांमध्ये अनोखा उत्साह दिसून येत होता.
या महोत्सवाचे यशस्वी आयोजन प्राचार्य डॉ.सतीश कामत यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख प्रा.जगदीश राणे यांच्या नेतृत्वाखाली सर्व कर्मचाऱ्यांनी केले.