*कोकण Express*
*कुडाळ ग्रामिण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय: प्रसाद गावडेनी वेधले लक्ष*
कुडाळ ग्रामिण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ नसल्याने रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे.याबाबत आज महाराट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील यांचे लक्ष वेधले.
मनसेचे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर व कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ मनसे शिष्टमंडळाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ श्रीपाद पाटील यांची आज भेट घेत कुडाळ ग्रामिण रुग्णालयीन समस्यांबाबत निवेदनाद्वारे लक्ष वेधले. कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील कार्यरत स्त्रीरोगतज्ञ डॉ.वालावलकर हे मागील काही महिन्यांपासून आजारग्रस्त असल्याने वैद्यकीय सुट्टीवर आहेत. डॉ.वालावलकर यांनी त्यांचे कार्यकाळात गोर गरीब जनतेला अतिशय चांगली सेवा देवून रुग्णालय अतिशय चांगल्या प्रकारे हाताळले मात्र त्यांच्या अनुपास्थित्तीत तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून रोज येणाऱ्या गोरगरीब रुग्णांची, तज्ञ डॉक्टर अभावी परवड होत असल्याच्या जनतेच्या तक्रारी मनसेकडे प्राप्त झाल्या आहेत.शिवाय रुग्णालयात मुख्य डॉक्टर नसल्याने कर्मचाऱ्यांवर कुणाचाही धाक उरला नसल्याने अनेक कर्मचारी कामकाजाच्या वेळेत हॉस्पिटलमध्ये गैरहजर असतात. डॉ.वालावलकर यांनी त्यांचे कार्यकाळात असंख्य प्रसूती, शस्त्रक्रिया करून गोरगरीब कष्टकरी जनतेची सेवा केलेली आहे,मात्र सद्यस्थितीत ते आजारी असल्याने रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.वास्तविक कुडाळ मधील महिला बाल रुग्णालय अद्याप सुरु नाहीच,शिवाय जिल्हा रुग्णालय देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सेवा देण्याएवढे सक्षम नाही. अशा परीस्थितीत जनतेकडे खाजगी रूग्णालयाशिवाय पर्याय उरत नसून खाजगी रुग्णालयामध्ये वैद्यकीय सेवेच्या नावाखाली प्रचंड आर्थिक लूट केली जाते हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे कुडाळ ग्रामिण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर नसणे म्हणजे एकप्रकारे खाजगी रुग्णालयांना अधिक लुटमारीची संधी दिल्यासारखेच आहे. प्राप्त परिस्थिती व जनभावना लक्षात घेता डॉ. वालावलकर पूर्ववत सेवेत हजर होईपर्यंत अन्य स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरना कुडाळ ग्रामिण रुग्णालय येथे तात्काळ प्रतिनियुक्ती देण्यात यावी अशी मनसेने आग्रही मागणी यावेळी निवेदनातून केली आहे.निवेदनाची दखल न घेतल्यास मनसे जनतेच्या होणाऱ्या गैरसोयीबाबत आक्रमक पवित्रा घेत तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकरतालुका सचिव राजेश टंगसाळी, उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे, अविनाश अणावकर,विद्यार्थी सेना प्रमुख गुरू मर्गज,शाखाध्यक्ष वैभव धुरी, सचिन मयेकर,आदि उपस्थित होते.