*कोकण Express*
*पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्या सिंधुदुरत्न समृद्ध योजनेचा लोकार्पण*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्गातील शेतकरी, मच्छिमार, पर्यटन व्यावसायिक, कसबी कारागीर, हस्तकला आधारीत, पारंपारिक व्यावसायिक, सुशिक्षित युवक-युवती-महिला अशा प्रत्येक उद्यमशील व्यक्तीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारकडून ‘सिंधुरत्न समृद्ध योजना‘ राबविण्यात आहे. या योजनेचा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठीचा लोकार्पणा सोहळा २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता वेंगुर्ला येथील मधुसूदन कालेलकर बहुउद्देशीय सभागृहात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते तसेच सिंधुदुर्ग पालकमंत्री उदय सामंत व रत्नागिरी पालकमंत्री अॅड.अनिल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
दरम्यान, मंत्री आदित्य ठाकरे यांचा तालुक्यात अन्य ठिकाणी दौरा असून या दौ-याच्या नियोजनासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कालेलकर सभागृहात बैठक पार पडली. यावेळी दौ-याची माहिती देताना आमदार केसरकर म्हणाले की, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे सकाळी चिपी विमानतळावर उतरल्यानंतर मालवण, देवगड येथे भेटी दिल्यानंतर दुपारी वेंगुर्ला तालुक्यात प्रवेश करताना कोंडुरा मार्गे वायंगणी येथे येऊन दुपारी ३ वाजता कासव जत्रेचे उद्घाटन करतील. त्यानंतर आरवली-सागरतीर्थ येथे जातील. फोमेंतो गेट येथे त्यांचे स्वागत होईल. येथील कार्यक्रमानंतर वेंगुर्ला बंदराला भेट देऊन सागर बंगलाच्या नुतनीकरणाचा शुभारंभ त्यांच्या हस्ते होईल. तसेच येथील बंदर, झुलता पुल व नवाबाग येथे सुरु असलेल्या विकासात्मक कामांची पहाणी करतील असे सांगत या बैठकीला उपस्थित असलेल्या तहसिल, वन, सार्वजनिक बांधकाम, मत्स्य, कृषी, मेरीटाईम, पत्तन व नगरपरिषदेच्या अधिका-यांना दौरा यशस्वी करण्यासाठीच्या सूचनाही दिल्या.
या बैठकीला तहसिलदार प्रविण लोकरे, पोलिस निरीक्षक तानाजी मोरे, मुख्याधिकारी डॉ.अमितकुमार सोंडगे, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख सुनिल डुबळे, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत परब, शहरप्रमुख अजित राऊळ यांच्यासह अतुल बंगे, सचिन वालावलकर, पंकज शिरसाट, डेलिन डिसोजा, तुषार सापळे, संदेश निकम, सुनिल मोरजकर, विवेक आरोलकर, उमेश येरम, आनंद बटा, वेदांग पेडणेकर, गजू गोलतकर, वायंगणी सरपंच सुमंत कामत आदी उपस्थित होते. फोटोओळी – पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या नियोजन बैठकीत आमदार केसरकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.