*कोकण Express*
*ऐनारी होळीचा मांड येथे उद्या ‘सरता खेळ’*
*पारंपरिक ‘शाहीरी तमाशा’ ठरणार लक्षवेधी*
*वैभववाडी/प्रतिनिधी*
ऐनारी येथे एक आगळी वेगळी परंपरा असलेला शिमगोत्सव विशेषतः ‘शाहीरी तमाशा’ हा खेळ आजही मोठ्या दिमाखात खेळला जातो. शुक्रवार दि. २५ मार्च रोजी हा उत्सव हजारोंच्या उपस्थितीत संपन्न होत आहे.
पांडवकालीन पर्यटन स्थळ म्हणून ऐनारी गावची खास ओळख आहे. येथील श्री.देव गांगेश्वर देवालय प्रसिद्ध आहे. ऐनारी देवस्थानातील हा नऊ दिवसांचा उत्सव असून, या उत्सवासाठी मुंबईस्थित चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. या उत्सवादरम्यान माहेरवाशीणी येवून पालखीची ओटी भरतात. या शिमगोत्सवात पारंपरिक पध्दतीने ‘शाहीरी तमाशा’ खेळण्याची आजही प्रथा सुरू आहे. होळीपासून नऊ दिवस हा उत्सव अगदी धुमधडाक्यात साजरा केला जातो. विशेषतः माधवी, गणपती, महादेव, सरस्वती, गरुड, सापाड, भिल्ल, फरड आदी पारंपारिक खेळ लक्षवेधी ठरणार आहेत. शुक्रवार दि. २५ मार्च रोजी सकाळी पूजा अर्चा तसेच रात्री ढोल ताशांच्या गजरात, आभीर गुलालांची उधळण करत फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या उत्साहात पालखी नाचविली जाते. त्यानंतर विविध देवदेवतांची सोंगे काढली जातात. असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पाडले जातात. तरी भाविकांनी या सरत्या खेळाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देव गांगेश्वर विश्वस्त व्यवस्था ऐनारी यांच्यावतीने करण्यात आले आहे.