*कोकण Express*
*कासार्डे तिठ्यावर शिवजयंती उत्साहात साजरी*
*कासार्डे ः संजय भोसले*
नवतरुण उत्कर्ष मंडळ कासार्डे व राजा शिवछत्रपती ग्रुप कासार्डे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या शिवजयंतीला( तिथीप्रमाणे) सर्वच थरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून आज सकाळपासूनच कासार्डे तिट्टा नवचैतन्याने गजबजून गेला होता.
शिवजयंती उत्सवाची सुरुवात भव्य मोटारसायकल रॅलीने झाली होती. तर आज प्रत्यक्ष कार्यक्रम स्थळी मान्यवरांचे मोठ्या दिमाखात स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींची प्रतिष्ठापना करून, मान्यवरांच्या हस्ते पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर संतोष पारकर ,प्रवीण कुडतरकर, संजय पवार, शिवराम पाताडे ,जयप्रकाश परब ,राजा सावंत, सुहास नकाशे ,स्पर्धेचे परीक्षक संतोष राणे, मंगेश दहिफळे ,महेंद्र देवरूखकर( पोलीस पाटील), कासार्डे केंद्रातील सर्व जि.प.शाळांचे मुख्याध्यापक, कार्यक्रमाचे कार्यकारी मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित प्रसंगाचे सादरीकरण स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये कासार्डे केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे विद्यार्थ्यानी उस्फूर्तपणे सहभाग घेतला होता. त्यांचे सादरीकरणास उपस्थितांनी प्रचंड टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. या बाळगोपाळांनी सादर केलेल्या पोवाडे, नाट्याभिनय, काव्य वाचन, रेकॉर्ड डान्स,आणि प्रतिज्ञा इत्यादी कार्यक्रमानी कासार्डे तिट्टा अगदी शिवमय होऊन गेला होता. याच बरोबर” स्वीटलँड इंग्लिश मीडियम स्कूलच्या” विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मर्दानी खेळाने तर उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणेच फेडले.
या विविध कलागुणांच्या कार्यक्रमानंतर सामाजिक ,कला— क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे मान्यवर आणि विद्यार्थी यांचा गुणगौरव कार्यक्रम संपन्न झाला. तर शेवटच्या सत्रामध्ये बुवा विजय सावंत विरुद्ध बुवा संदीप लोके यांचा आमने-सामने डबलबारीचा जंगी मुकाबला सादर करण्यात आला.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल जमदाडे यांनी मांडले आणि उपस्थितांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.