सांगवेत रिक्षा-दुचाकीमध्ये भीषण अपघात दोन जागीच ठार तर चार जखमी; सर्व हरकुळ बुद्रुकमधील!

*कोकण Express*

*सांगवेत रिक्षा-दुचाकीमध्ये भीषण अपघात दोन जागीच ठार तर चार जखमी; सर्व हरकुळ बुद्रुकमधील!*

*सांगवे – केळीचीवाडी येथे कणकवली – कनेडी मार्गावर झाला अपघात…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

 कणकवली-कनेडी मार्गावर सांगवे-केळीचीवाडी येथे शुक्रवारी दुपारी १२.३० वा. च्या सुमारास रिक्षा व मोटरसायकलमध्ये समोरासमोर जोरदार धडक झाली. अपघात एवढा भीषण होता की मोटरसायकलवरील परशुराम अनंत पांचाळ (वय ४८) व अमित प्रभाकर मेस्त्री (वय ३६ ) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर रिक्षाचालकासह चौघे जखमी झाले असून त्यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपघातात ठार झालेले हे हरकुळ बुद्रुक-सुतारवाडीतील तर सर्व जखमी हरकुळ बुद्रुक-बोंडकवाडी येथील आहेत. जखमींना अधिक उपचारासाठी ओरोस जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

अपघातात रिक्षाचालक गणेश अशोक घाडीगावकर (वय ३०) याच्या चेहर्‍याला दुखापत झाली आहे. तर प्रवाशी बाळकृष्ण सदाशिव घाडीगावकर (७०) यांच्या डोक्याला तर मनोहर बाळकृष्ण घाडीगावकर (४२) व सौ. माधुरी मनोहर घाडीगावकर (३६) यांच्या पायांना दुखापत झाली आहे. जखमींना तातडीने उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील मनोहर व सौ. माधुरी यांना गंभीर दुखापत झालेली असल्याने त्यांना पडवे येथील रूग्णालयात हलविण्यात आले.

हरकुळ बुद्रुक येथील बाळकृष्ण घाडीगावकर हे मुलगा मनोहर व सून सौ. माधुरी यांच्यासमवेत गणेश घाडीगावकर यांच्या रिक्षाने कनेडी बाजारपेठ येथे जात होते. रिक्षा सांगवे-केळीचीवाडी येथे आली असता कनेडीवरून हरकुळ बुद्रुकच्या दिशेने येणार्‍या मोटरसायकलची जोरदार धडक बसली. अमित मेस्त्री हे मोटरसायकल चालवत होते, तर परशुराम पांचाळ मागे बसले होते. अपघातानंतर मोटरसायकलच्या मागे बसलेले परशुराम पांचाळ हे ३० ते ४० फूट फेकले गेले. वाहनांची धडक एवढी जोरदार होती की रिक्षाचालक व प्रवाशी आतच अडकून राहिले होते. गंभीर दुखापत झालेली असल्याने त्यांना बाहेर पडता येत नव्हते. तर मोटरसायकलवरील दोघेही रक्‍ताच्या थारोळ्यात रस्त्यावर पडले होते. दोघांनाही गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.
जखमींना उपचारासाठी कणकवली उपजिल्हा रूग्णालयात आणल्यानंतर पं.स. सदस्य मंगेश सावंत, माजी पं. स. सदस्य राजू पेडणेकर, हरकुळ बुद्रुक माजी सरपंच आनंद ठाकूर, वामन गोसावी, डॉ. श्रीकृष्ण आर्डेकर, अ‍ॅड. प्रकाश पावसकर, अतुल मेस्त्री, वामन मेस्त्री, नंदू मेस्त्री, दीपक मेस्त्री, सचिन मेस्त्री, लतेश कदम, लक्ष्मण मेस्त्री यांनी धाव घेतली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमधील परशुराम पांचाळ हे मुंबईत बँकेत नोकरीला आहेत. तुलसी विवाहासाठी ते शुक्रवारी सकाळी गावी आले होते. हरकुळ बुद्रुक-सुतारवाडीतील भिरवंडेकर कुटुंबातील असलेले परशुराम पांचाळ हे अमित मेस्त्री समवेत कनेडी बाजारपेठेत त्याच्या मोटरसायकलवरून गेले होते. परशुराम पांचाळ यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी असा परिवार आहे. तर अमित मेस्त्री हा अविवाहित असून पश्‍चात आई व भाऊ असा परिवार आहे. अपघातात मृत्यू झालेले दोघेही शेजारी राहणारे असल्याने सुतारवाडीमध्ये शोककळा पसरली होती. तर जखमींमधील मनोहर घाडीगावकर व सौ. माधुरी घाडीगावकर यांना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात येणार आहे.
अपघाताची माहिती मिळाल्यानंतर कणकवली उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. नितीन कटेकर, पोलिस निरीक्षक संजय धुमाळ, पोलिस उपनिरीक्षक जगदीश बांगर, अनमोल रावराणे, धनश्री पाटील, कनेडी दुरक्षेत्राचे पोलिस तसेच हरकुळ बुद्रुकचे पोलिस पाटील संतोष तांबे हे तातडीने अपघातस्थळी पोहोचले होते.

परशुराम पांचाळ
अमित प्रभाकर मेस्त्री

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!