कणकवली, देवगड मध्ये नवीन 23 धरण प्रकल्पांसाठी सर्वेक्षणाची मागणी

कणकवली, देवगड मध्ये नवीन 23 धरण प्रकल्पांसाठी सर्वेक्षणाची मागणी

*कोकण  Express*

*कणकवली, देवगड मध्ये नवीन 23 धरण प्रकल्पांसाठी सर्वेक्षणाची मागणी*

कणकवली : प्रतिनिधी

कणकवली व देवगड तालुक्यातील जास्तीतजास्त जमीन ओलिताखाली यावी यासाठी लघू सिंचन धरण प्रकल्पांची आवश्यकता आहे. यासाठी कणकवली तालुक्यातील 9 व देवगड तालुक्यातील 14 ठिकाणी धरण प्रकल्प उभारता येणे शक्य आहे. त्यामुळे या नवीन धरणांसाठी सर्व्हेक्षण व्हावे अशी मागणी शिवसेना नेते सतीश सावंत यांनी खा.विनायक राऊत यांच्याकडे केली होती. त्यानुसार या नवीन धरण प्रकल्पांच्या सर्व्हेक्षणासाठीचे पत्र खा.विनायक राऊत यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग, रत्नागिरी यांना पत्र दिले आहे.
सिंधुदुर्गातील कणकवली व देवगड तालुक्यात लघू सिंचन प्रकल्प झाल्यास या भागातील शेतकर्‍यांना उन्हाळ्यात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. शिवसेनेच्या माध्यमातून सतीश सावंत यांनी काही दिवसांपूर्वी या दोन्ही तालुक्यातील काही गावांमध्ये लघू सिंचन प्रकल्प होणे शक्य आहे. अशा जागांची पाहणी केली होती. गावागावांमध्ये लघू सिंचन प्रकल्प झाल्यास तेथील नदीनाल्यांना बारमाही पाणी होतानाच भूगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस होवुनही अनेक गावांमध्ये उन्हाळ्यात पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. असे लघू सिंचन प्रकल्प झाल्यास पाणीटंचाईवर कामयस्वरूपी उपाय योजना होतानाच पडिक जमीन लागवडीखाली येण्यास मदत होणार आहे. याच विचारातून सतीश सावंत यांनी कणकवली व देवगड तालुक्यातील तब्बल 23 ठिकाणी लघू सिंचन प्रकल्प उभारता येणे शक्य आहे याची प्राथमिक माहिती घेतल्यानंतर जलसंधारण विभागाकडून त्यासाठीचे प्राथमिक सर्व्हेक्षण होण्यासाठी खा.विनायक राऊत यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
सिंधुदुर्गात जास्तीतजास्त लघू सिंचन प्रकल्प होणे आवश्यक आहे. ही गरज लक्षात घेवून खा.विनायक राऊत यांनी रत्नागिरी जलसंधारण विभागाला तसे पत्र तातडीने दिले आहे. सर्व्हेक्षण करतानाच लघू सिंचन धरण प्रकल्प मंजूर होण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, असे खा.राऊत यांनी पत्रात नमुद केले आहे. सुचविण्यात आलेल्या प्रत्येक प्रकल्पातून सुमारे 100 ते 250 हेक्टर पर्यंत जमीन ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे या गावांबरोबरच परिसरातील गावांमध्येही शेतीसाठी आणि पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे, याकडेही खा. विनायक राऊत यांनी जलसंधारण विभागाचे लक्ष वेधले आहे.
शिवसेना नेते सतीश सावंत यांनी सुचविलेल्या धरण प्रकल्पांमध्ये कणकवली तालुक्यातील दिगवळे (रांजणवाडी), हरकुळ बुद्रुक (मोरजे तलाव), बिडवाडी (गणेशकोंड), तळवडे (ओवळीचा सखल), सावडाव (पाझर धबधब्याजवळ), करंजे(गावठण), नागवे(आईनमळावाडी), शेरपे (भटवाडी आमनिसखल), दारीस्ते(सांगवेकरांचे कास). तर देवगड तालुक्यातील हिंदळे (प्रभुवाडी येथील गायगोठन तळे), नारिग्रे (सुकेतळे), दहिबाव(कुपलवाडी), तळवडे (न्हावणकोंड), रेंबवली (मुरली सावंत यांच्या घराजवळ रेंबवली नदीवरती), पोभूर्ले (आडीचे धरण), शिरवली(महादेववाडी), विठ्ठलादेवी (पाठवणेवाडी), साळशी (देवणेवाडी), साळशी(तळीचे ठिकाण), साळशी(धनगरवाडी जांभळ नजिक), शिरगांव (निमतवाडी कोंडोशी), महाळुंगे (पाटीलवाडी), जामसंडे(मखरवाडी)या जागांचा समावेश आहे.
गावागावांमध्ये छोटी छोटी धरणे झाल्यास पावसाचे पाणी साठवणे अधिक सोयीचे होणार आहे. सिंधुदुर्गातील नैसर्गिक स्थितीचा विचार करता मध्यम पाटबंधारे प्रकल्प उभारण्यास अनेक अडचणी येतात. त्याचा मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांना उपयोग होत नाही. मात्र लघू सिंचन प्रकल्प झाल्यास गावागावात मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे. शेतीबागायतीसाठी बारमाही पाणी उपलब्ध होणार असून कृषी क्षेत्राच्या माध्यमातून रोजगाराची संधी गावागावात उपलब्ध होणार आहे, असे सिंधुदुर्ग बँकेच्या माजी अध्यक्ष, शिवसेना नेते सतीश सावंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!