*कोकण Express*
*शहरात सत्ता नसली तरी कणकवली साठी सर्वाधिक विकास निधी ६ कोटी २ लाख रुपयांचा आम्हीच आणला*
*शिवसेना नेते संदेश पारकर यांची माहिती*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली शहरात नगरपंचायत मध्ये शिवसेनेची सत्ता नसली तरी२०१८-१९ व २०१९-२० या दोन वर्षात शहराच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून ६ कोटी २ लाख रुपयांचा निधी शिवसेनेच्या माध्यमातून देण्यात आला. पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर, वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या महत्वाच्या गरजांसाठी हा निधी देण्यात आल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली. शहरात प्रामुख्याने क्रीडांगण आरक्षण, विकसित करण्यासाठी ४ कोटींचा निधी तसेच शहरातील रस्ते गटार या कामांसाठी ३० लाख, अग्निशमन केंद्रासाठी १ कोटी ७२ लाख रुपयांचा निधी देण्यात आला. तसेच अजून ५ कोटीचा निधी देण्यात येणार असल्याचे पारकर यांनी सांगितले. यामध्ये श्रीधर नाईक उद्यानसाठी १ कोटी तरतूद करण्यात आली. तर छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी १ कोटीची तरतूद करण्यात आली आहे. तीन कोटींच्या निधीतून शिवसेनेच्या नगरसेवकांकडून सुचविण्यात येणारी शहरातील अंतर्गत विकास कामे करण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकासआघाडी यांच्याकडून कणकवली शहराच्या विकासावर लक्ष देण्यात आला आहे. शहराच्या विकासाची जबाबदारी महाविकास आघाडी सरकारची आहे. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी हा निधी देण्यात येणार असून, या निधीतून लवकरच प्रस्तावांना मंजुरी व कामाची भूमिपूजन करून वर्षभरात या कामांचे लोकार्पण केले जाईल अशी माहिती पारकर यांनी दिली. सरकारला उद्या एक वर्षाचा कालावधी पूर्ण होत असताना अवघ्या चार महिन्याच्या कालखंडात जनतेच्या हिताचे निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतले. जिल्ह्यात आरोग्य व्यवस्था सुधारत असतानाच कोरोना तपासणी लॅब, ऑक्सीजन प्लांट, वैद्यकीय महाविद्यालयाला एक शंभर कोटीच्या आराखड्याला मान्यता हे शिवसेनेचे काम आहे. कोकणाबरोबर शिवसेनेचे नाते आहे. जनतेच्या हिताचे निर्णय शिवसेनेकडून घेतले जात आहेत. त्याचबरोबर कणकवली शहराच्या विकासासाठी शिवसेना व आम्ही कटिबद्ध आहोत. शहरातील बसस्थानक येथे व्यापारी संकुल, गणपती सना येथे केटी बंधारा यासाठी खासदार विनायक राऊत व पालकमंत्री उदय सामंत आमदार वैभव नाईक, दीपक केसरकर यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. भालचंद्र महाराज आश्रमाजवळ भाविकांना थांबण्यासाठी शेडचे कामही प्रगतिपथावर आहे. आम्ही सत्तेत नसलो तरी शहराच्या विकासाची जबाबदारी आमचीच आहे असे पारकर यांनी सांगितले. शिवाजी महाराजांचा सध्या चौकात असलेला पुतळा जिल्हा परिषदच्या गावठी आठवडा बाजार भरत असलेल्या जागेत स्थलांतरित करून तेथे महाराजांचे भव्य स्मारक उभारण्यात येणार आहे. कणकवली शहरातील ४५ मीटर आर ओ डब्ल्यू लाईनच्या आत अनधिकृत बांधकाम करता येणार नाही अशी आमची भूमिका आहे. यासाठी महामार्ग प्राधिकरणकडून हद्द निश्चित करण्यात यावी अशी मागणीही वारंवार करण्यात आली आहे. मात्र त्याची दखल महामार्ग प्राधिकरण कडून घेतली जात नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले पालकमंत्री उदय सामंत यांची उद्या भेट करून घेत हे प्रश्न त्यांच्यासमोर मांडण्यात येणार आहेत. तसेच शहरातील महामार्गाच्या प्रश्नासंदर्भात तातडीने बैठक लावून हे प्रश्न सोडविण्यावर भर देण्यात येणार आहे. लोकांच्या प्रश्नासाठी यापुढेही आम्ही लढतच राहु त्यासाठी गंभीर भूमिका घ्यावी लागली तरी आमची तयारी असणार आहे. जर बैठक घेऊनही हायवेचे प्रश्न सुटत नसतील तर प्रसंगी आंदोलन किंवा उपोषणाचा पर्यायही अवलंबिण्यात येईल असा इशारा संदेश पारकर यांनी दिला. आम्ही सत्तेत नसलो तरी शहराच्या विकासात आम्ही दुजाभाव केला नाही असे विरोधी गटनेते सुशांत नाईक यांनी सांगितले. यावेळी विरोधी गटनेते सुशांत नाईक तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेविका मानसी मुंज, माहि परूळेकर, युवा सेनेचे राजू राठोड, सुजित जाधव, ऍड हर्षद गावडे, प्रसाद अंधारी, तेजस राणे, साक्षी आमडोस्कर आदी पदाधिकारी उपस्थित होते.