*कोकण Express*
*सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस कुडाळ येथे केला साजरा*
*शिवसेना सरपंच संघटनेने केक कापून केला वाढदिवस साजरा*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग-रत्नागिरीचे खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस शिवसेनेच्या सरपंच संघटनेने पावशी कुडाळ येथे विनायक राऊत यांच्या हातून केक कापून साजरा केला.
कुडाळ तालुक्यातील पावशी येथे सरपंच संघटनेच्या वतीने रस्सीखेच स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी खासदार विनायक राऊत व त्यांची कन्या रुची राऊत या खास उपस्थित राहणार होत्या. विनायक राऊत व रुची राऊत रात्री १२ वाजता स्पर्धेच्या ठिकाणी पोचल्या. त्यावेळी खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस असल्याने शिवसेना सरपंच संघटनेच्या वतीने केक कापून त्यांचा वाढदिवस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला. खासदार राऊत यांचे सर्वसामान्य कार्यकर्त्यांशी असलेलं आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते कार्यकर्त्यांचा त्यांच्या भोवती असलेल्या गराड्यावरून दिसून येते. जिल्ह्यातील तळागाळातील कार्यकर्त्यांना ते भेटतात, कोणताही बडेजाव नाही की मोठेपणा, त्यामुळे जिल्ह्यातील अनेकांच्या गळ्यातील ताईत बनलेलं नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
सर्वसामान्य जनतेच्या संकट काळात धावून जाणारे, पोकळ आश्वासने न देता दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करणारे विनायक राऊत खऱ्या अर्थाने आपल्या पदाला न्याय देत असतात, कोणताही गाजावाजा न करता विकासपुरुष या बिरुदावलीला सार्थ ठरत विनायक राऊत यांनी जिल्ह्यातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न नव्हे तर प्रत्यक्षात सोडवले. जिल्ह्यासाठी अत्यंत आवश्यक असणारे सरकारी मेडिकल कॉलेज आमदार केसरकर, आमदार वैभव नाईक, पालकमंत्री उदय सामंत यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेत सुरू केले. दोडामार्ग येथील वनौषधी प्रकल्पासारखे विकासात्मक काम करत त्यांनी जिल्ह्याला विकासाच्या दिशेने नेलं. परंतु अशी विकासात्मक कामं करताना कधीही त्यांनी श्रेय घेण्याचा प्रयत्न केला नाही किंवा गाजावाजा नाही यावरूनच बाळासाहेब ठाकरेंच्या मुशीतून तयार झालेला शिवसैनिक कसा असतो याचे प्रत्यंतर येते. त्यामुळेच मतदारसंघातील जनतेने दोनवेळा त्यांच्यावर प्रचंड विश्वास दाखविला आहे.
खासदार विनायक राऊत यांच्यावरील प्रेमापोटीच कुडाळ येथे कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा करत त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. याप्रसंगी सिंधुदुर्ग शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पडते, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, कुडाळ पंचायत समिती उपसभापती जयभारत पालव तसेच शिवसेनेचे अनेक सरपंच, शिवसैनिक उपस्थित होते.