*कोकण Express*
*ठाकरे सरकारचा अर्थसंकल्प सादर, विविध क्षेत्रांसाठी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा..!*
महाराष्ट्रासाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरला. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी 2022-23 वर्षासाठीचा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पातून कोणत्या क्षेत्राला काय मिळणार, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले होते.
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल नुकताच सादर करण्यात आला असून, त्यात महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला गती मिळाल्याचे दिसते.. 2021-22 या आर्थिक वर्षात राज्याच्या विकासदरात 12. 1 टक्क्यांची वाढ झाल्याचे अहवालात म्हटले आहे. महाराष्ट्र हे एक ट्रिलियन अर्थव्यवस्था असणारं पहिलं राज्य ठरल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले..
अर्थसंकल्पातील महत्वाच्या घोषणा
शेतकऱ्यांना काय मिळाले..?
– नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 50 हजार रुपयांऐवजी आता 75 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार. राज्यातील 20 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार असून, त्यासाठी 10 हजार कोटी खर्च अपेक्षित आहे. भूविकास बॅंकेच्या 34 हजार 788 कर्जदार शेतकऱ्यांची 964 कोटी 15 लाख रुपयांची कर्जमाफी केली जाणार.
– केंद्राच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या पीकविमा योजनेतून गुजरात व अन्य काही राज्यांप्रमाणे या योजनेतून महाराष्ट्राचाही बाहेर पडण्याचा विचार
– कोकण व परभणी कृषी विद्यापीठाला प्रत्येकी 50 कोटींचा निधी मिळणार
– महाराष्ट्रात येत्या 2 वर्षांत 104 सिंचन प्रकल्प पूर्ण करणार. पंतप्रधान सिंचन प्रकल्प योजनेतून 11 प्रकल्प होणार.
– विदर्भ, मराठवाड्यात कापूस व सोयाबीन उत्पादकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना 1 हजार कोटींचा निधी देणार
– शेततळ्यांच्या अनुदानाच्या रकमेत 50 टक्के वाढ, 75 हजार रुपये अनुदान मिळणार.
– अन्न प्रक्रिया योजना राबवणार
– यंदाच्या वर्षात 60 हजार कृषी पंपांना वीज देणार, 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचं लक्ष्य.
– महिला शेतकऱ्यांचा योजनेत 30 टक्के सहभाग वाढवून 50 टक्के केला जाणार. तरतुदीच्या 3 टक्के निधी आजी-माजी सैनिकांसाठी देण्यात येणार.
– बैलांच्या आरोग्यासाठी मुंबईतील बैलघोडा पशूवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटींचा निधी दिला जाणार.
– हिंगोली येथे बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारणार. हळदीपासून निर्माण होणाऱ्या सौंदर्य प्रसाधनाला महत्व येणार.
– बाजार समित्यांमधील पायाभूत सुविधांसाठी यंदा 5 हजार कोटींची तरतूद.
आरोग्य क्षेत्राला काय..?
– आरोग्य सेवांवर आगामी तीन वर्षात 11 हजार कोटी खर्च करणार.
– मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला 10 कोटी रुपयांचा निधी, सदृढ पशुधनासाठी 3 फिरत्या पशूशाळा उभारणार. 8 कोटी रुपयांची 8 मोबाईल कर्करोग निदान वाहनं पुरवणार.
– सर्व जिल्ह्यात महिला रुग्णालय उभारणार. प्रत्येक जिल्ह्यात टेलीमेडिसीन रुग्णालय उभारणार, 3183 कोटींचा निधी. पुण्यात 300 एकरांवर इंद्रायणी मेडिसिटी उभारणार, सगळे उपचार एकाच छताखाली मिळणार
शैक्षणिक क्षेत्राला काय..?
– शालेय शिक्षण विभागासाठी 2353 कोटी, क्रीडा विभागासाठी 385 कोटी रुपयांचा निधी
– महर्षी कर्वे, साने गुरुजी, सावित्रीबाई फुले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगेबाबा महाराज, क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या गावातील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी 1 कोटींचा निधी.
– शिष्यवृत्ती, फेलोशिपद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार.
– तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी, यासाठी इनोव्हेशन हब सुरु करणार.
– शाळांच्या सोयी सुविधांसाठी जिल्हा स्तरावर 5 टक्के निधी
अन्य महत्वाच्या घोषणा
– हवेलीमध्ये छत्रपती संभाजीराजे महाराजांचे स्मारक उभारणार, त्यासाठी 250 कोटीची तरतूद.
– लता मंगेशकर यांच्या नावानं उभारण्यात येणाऱ्या केंद्रासाठी 100 कोटींचा निधी
– प्रशिक्षित मनुष्यबळासाठी सर्व योजना आधार कार्डशी संलग्नित करणार.
– क्रीडा विभागासाठी 354 कोटींचा निधी, तर आदिवासी विकास विभागासाठी 11 हजार 199 कोटी देणार.
– गडचिरोली येथे नवीन विमानतळ उभारण्याचा प्रस्ताव, शिर्डी विमानतळासाठी 1500 कोटी, रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटींची निधी.
– तृतीयपंथी नागरिकांना ओळखपत्र व रेशनकार्ड देण्यात येणार.
– महाबळेश्वर, अजिंठा, वेरुळचा सर्वांगिण विकास करणार, सुविधा केंद्र सुरु करणार
– मुंबई, पुणे, नागपूरमध्ये स्वातंत्र्यलढा हेरिटेज वॉक सुरु करणार
– ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शनसाठी 50 कोटींची तरतूद, 40 पेक्षा अधिक वय असणाऱ्या कर्मचाऱ्यांची आरोग्य चाचणी करणार
– नवी मुंबईत ‘महाराष्ट्र भवन’ उभारण्यात येणार, त्यासाठी 100 कोटी
– मराठी भाषा विभागाला 50 कोटी, माहिती व जनसंपर्क विभागाला 250 कोटी निधी
– कोविड काळात कर्तव्यावर असताना निधन झालेल्या व्यक्तींच्या वारसांसाठी 50 लाखांचा निधी
– कोरोनाने जीव गमावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांची मदत.