*कोकण Express*
*ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली – ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर*
*म्हणूनच आज महिला चौकटी बाहेर पडून जगाला गवसणी घालत आहेत*
*कणकवली ः प्रतिनिधी*
ज्या काळात महिलांना कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते ,शिक्षणाची व्यवस्था नव्हती, अशा प्रतिकूल परिस्थितीत स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी त्याकाळच्या प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. म्हणूनच आजच्या काळात चुल आणि मुल यापुढे जाऊन महिलांनी सर्वच क्षेत्रात पुरुषांबरोबर खांद्याला खांदा लावून उल्लेखनीय काम केले आहे .आज स्त्रियांनी विविध क्षेत्रात भरारी घेऊन प्रगती केली आहे.आजच्या इंटरनेटच्या युगात तर अनेक महिला घरची कामे सांभाळीत मोबाईलवर ऑनलाईन शिक्षण प्राप्त करीत आहेत.देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी महिला आपले चांगले योगदान देत आहेत.म्हणूच आजच्या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.आज विविध स्तरातून महिलांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य वारकरी संप्रदाय मंडळाचे अध्यक्ष ह.भ.प.विश्वनाथ गवंडळकर यांनी केले.
ते शिरवल टेंबवाडी येथे प्राणजीवन सहयोग संस्था आणि ओमगणेश मित्रमंडळ शिरवल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला दिनाच्या कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर राजश्री चौकेकर, प्रतिभा पांचाळ,सुधा कुडतरकर, तनिष्का कुडतरकर, सुरेखा मेस्त्री,सारीका गुरव,रसिका शिरवलकर, प्रज्ञा मेस्त्री, प्रणाली कासले,प्राण जीवन सहयोग संस्था,
सदस्य श्रीकृष्ण यादव,पोलिस पाटील विजय शिरवलकर, सुनिल कुडतरकर,दत्तात्रय प्रभूपाटकर, सुचित गुरव,ग्रा.पं.सदस्य पांडुरंग गुरव,चंद्रकांत तांबे,बाळु वालावलकर आदि उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना गवंडळकर म्हणाले कि, १३ व्या शतकामध्ये महिला संत रखुमाई,संतसखुबाई,संत मुक्ताबाई,संत जनाबाई,संत मीराबाई या सर्व महिला संतांनी अनेक अभंग लिहून महिलांचे आणि वारकरी संप्रदायांचे प्रबोधन केले आहे.आज वारकरी संप्रदायामध्येही महिला मोठ्या प्रमाणात सहभागी आहेत.महिलांना मोठ्या प्रमाणात सन्मान दिला जात आहे.महिलांवरील भेदभाव संपविण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.हा दिवस महिलांच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान वाटावा यासाठी साजरा केला जातो.असेही ते म्हणाले.
प्राण जीवन संस्थेचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते संदीप चौकेकर यांनी प्राणजीवन संस्थेच्यमाध्यमातून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन महिलांसाठी चांगले व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.आरोग्य शिबीर,नेत्र तपासणी शिबिर,ई-श्रम कार्ड शिबिर असे उपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपली आहे.असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
श्रीमती राजश्री चौकेकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन करण्यात आले.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आले.यावेळी लहान मुलांसाठी रेकॉर्ड डान्स घेण्यात आले.आणि महिलांना खेळ पैठणी स्पर्धा घेण्यात आली. खेळ पैठणी स्पर्धेत गावातील महिला सहभागी झाल्या होत्या.या स्पर्धेत सारीका गुरव विजेत्या तर रसिका शिरवलकर उपविजेत्या ठरल्या.प्रथम विजेत्या ठरलेल्या सारीका गुरव यांना राजश्री चौकेकर आणि प्रतिभा पांचाळ यांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.तर उपविजेत्या रसिका शिरवलकर यांना दत्तात्रय प्रभुपाटकर आणि विजय शिरवलकर यांच्या हस्ते पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले.गावातील महिला कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आणि आभार तुळशीदास कुडतरकर यांनी मानले.
:फोटो- शिरवल येथे महिला दिनाच्या कार्यक्रमात श्रीफळ वाढवून शुभारंभ करताना श्रीमती राजश्री चौकेकर सोबत,प्रतिभा पांचाळ,सुधा कुडतरकर, तनिष्का कुडतरकर, सुरेखा मेस्त्री,सारीका गुरव,रसिका शिरवलकर, प्रज्ञा मेस्त्री आदी