*कोकण Express*
*घोणसरी विकास सेवा सोसायटी नूतन संचालकांचे जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी केले अभिनंदन*
*जिल्हा बँकेकडून घोणसरी विकास सोसायटीला सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे दिले आश्वासन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
घोणसरी वि.का.स.सेवा सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकी दरम्यान भाजपा प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनल ला निवडून न आणल्यास येथील शेतकऱ्यांची कर्जप्रकरणे मंजूर होताना अडथळे येतील किंवा या सोसायटीला बँकेकडून सहकार्य मिळणार नाही अशा बातम्या पसरवल्या गेल्याने दबावाखाली असलेल्या येथील शेतकऱ्यांची आणि सोसायटीच्या नूतन संचालकांची जिल्हा बँक संचालक तथा युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी भेट घेऊन या घोणसरी विकास सेवा सोसायटीला जिल्हा बँकेकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी दिले.यावेळी माजी जि. प. सदस्य संदेश पटेल, युवासेना विभागप्रमुख सिद्धेश राणे,पवन भोगले,संजय सावंत, राजू रावराणे, निलेश राणे, उपविभागप्रमुख रवी शिंदे, शाखाप्रमुख मंगेश राणे, विजय मराठे, पांडुरंग जाधव, संदिप सुतार, मिलिंद खाडये, प्रसाद राणे, अनंत राणे, दिपक सावंत, स्वाती घाडी, नूतन संचालक दिपक पुंडलिक राणे, उदय राणे, विश्वजित अनंत राणे, प्रकाश प्रभाकर हिर्लेकर, रामदास महादेव इंदुलकर, भास्कर सीताराम साळवी, ऐश्वर्या अनंत सावंत, श्रद्धा अनंत राणे, कृष्णा महादेव एकावडे, रामा सोमा जाधव आदी उपस्थित होते.
घोणसरी विकास सेवा सोसायटी निवडणुकी दरम्यान भाजपा प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनल आणि शिवसेना प्रणित गांगेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनल सामोरासमोर निवडणूक रिंगणात उभे असताना प्रचारासाठी वेगवेगळे हातखंडे वापरताना भाजपा पुरस्कृत सिद्धिविनायक सहकार पॅनल चा प्रचार करण्यासाठी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि बँकेचे काही संचालक,कणकवली पं. स. चे सभापती मनोज रावराणे यांनी या विभागात सभा घेतल्या.निवडणूक पूर्वसंध्येलाच शिवसेनेतील काही कार्यकर्ते फोडून भाजपा प्रवेश घेतल्याने शिवसेनेला मोठा धक्का दिला.दरम्यान जिल्हा बँक भाजपा च्या ताब्यात असल्याने येथील सोसायटीला जिल्हा बँकेचे सहकार्य मिळण्यासाठी भाजपा प्रणित सिद्धिविनायक सहकार पॅनललाच मतदान झाले पाहिजे अन्यथा कर्ज प्रकरणे मंजूर होणार नाही अशा बातम्या पसरल्याने येथील शेतकऱ्यांमध्ये तसेच शिवसेना पुरस्कृत गांगेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनल चे उमेदवार दबावाखाली होते.
दरम्यान या निवडणुकीत असे दबावाचे आणि भीती चे राजकारण करून सुद्धा शिवसेना पुरस्कृत गांगेश्वर ग्रामविकास आघाडी पॅनल ने निर्विवाद विजय संपादन केला. आज या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यासाठी घोणसरी येथे आलेल्या युवासेना जिल्हाप्रमुख तथा जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांच्या समोर सोसायटीच्या नूतन संचालकांनी तसेच येथील शेतकऱ्यांनी निवडणुकीदरम्यान घातलेल्या भीती ची माहिती दिली.यावेळी सुशांत नाईक यांनी कोणीही घाबरून न जाण्याचे आवाहन करताना घोणसरी विकास सेवा सोसायटीला सर्वोतोपरी माझ्याकडून सहकार्य करण्याची ग्वाही दिली.यानंतर येथील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

