*कोकण Express*
*आंबोली कबुलायतदार गावकार जमिनप्रश्नी ८ मार्च रोजी धरणे आंदोलन*
*प्रांताधिकार्यांसोबत बैठक निष्फळ : स्थानिक आक्रमक*
*आंबोली । प्रतिनिधी*
आंबोलीतील कबुलायतदार गावकार जमिनप्रश्नी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाबाबत तोडगा काढण्यासाठी प्रांताधिकारी सावंतवाडी यांनी बैठक आयोजीत केली होती. या बैठकीतील चर्चे शेवटी प्रांताधिकार्यांकडून वरिष्ठ स्तरावर पाठपुरवठा करण्याचे सांगण्यात आले मात्र पदाधिकारी व अधिकारी यांना गेली कित्येक वर्षे निवेदने देऊन व आश्वासने ऐकून न्याय मिळत नसल्याने आता ८ मार्च रोजी धरणे आंदोलन करूनच सरकारचे व प्रशासनाचे कान व डोळे उघडण्याचे ठरले.
या बैठकीच्या सुरुवातीला प्रमुख गावकार शशिकांत गावडे, कृति समिती सदस्य उल्हास गावडे व सरपंच गजानन पालेकर यांनी कबुलायतदार प्रश्नाबाबत प्रांताधिकारी यांना माहीती दिली. तसेच न्यायालयात दावा सूरू असताना देखिल वन विभागाने चुकिच्या पद्धतिने वनखाते अशि नोंद घातली या बाबत आक्षेप नोंदवला. जी जवळपास ४० टक्के जमिन शिल्लक आहे त्याच्या वाटप व ज्या जमिनीवर वनखाते नोंद आहे त्यात भोगवाटदार म्हणून वहिवाट धारकांची नोंद घालायची मागणी बाबत चर्चा करण्यात आली.
मात्र, सदर विषय मंत्रालय स्तरावर असल्यामुळे त्याच्या सद्यस्थितीतील वस्तुस्थिती बाबत माहीती घेऊन सांगतो असे मा. प्रांताधिकारी यांनी सांगितले. तसेच जो पर्यंत प्रश्न मार्गी लागत नाही तो पर्यंत नित्य पंधरा विस दिवसांनी प्रत्यक्ष भेटून स्थिती बाबत आढावा घेण्याची प्रांताधिकारी यांनी ग्वाही दिली.
मात्र, याबाबत समाधान न झाल्याने अखेर ८ मार्च रोजी धरणे आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी शशिकांत गावडे, श्रीकांत गावडे, सरपंच गजानन पालेकर, उल्हास गावडे, सुनिल नार्वेकर, महादेव गावडे, प्रकाश गावडे, उपसरपंच दत्तु नार्वेकर, विलास गावडे, राजेश गावडे, वामन पालेकर आदी उपस्थित होते.