*कोकण Express*
*बापार्डे, परुळेबाजार ग्रामपंचायत ठरली विभागीय स्पर्धेला पात्र*
*ग्रामस्वच्छता अभियानात जिल्हास्तरावर मिळविले आहे यश;उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांची माहिती*
*ओरोस ः प्रतिनिधी*
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 अंतर्गत ग्रामपंचायत देवगड तालुक्यातील बापर्डे व वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायत यांची कोकण विभागस्तरासाठी निवड झाली आहे. लवकरच विभागस्तर तपासणी होणार असल्याची माहिती जिल्हा व पाणी स्वच्छता उप मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकूर यांनी दिली आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019- 20 अंतर्गत जिल्ह्यातील 50 ग्रामपंचायतीची तपासणी करण्यात आली होती. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राबविण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात स्वच्छ वार्ड जाहिर करुन दहा हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात आले आहे. या ग्रामपंचायती मधुन तालुकास्तरावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत तपासणी करुन जिल्हा परिषद प्रभागातील एका ग्रामपंचायतीची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेकरीता करण्यात आली होती.
तालुकास्तरावर जिल्हा परिषद प्रभागात असणा-या स्वच्छ ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान 2019-20 अंतर्गत ५० हजार रुपये पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. तालुकास्तरावरुन जिल्हा परिषद प्रभागनिहाय आलेल्या 50 ग्रामपंचायतीची जिल्हास्तरिय समितीने तपासणी मध्ये देवगड तालुक्यातील बापार्डे ग्रामपंचायतने प्रथम क्रमांक मिळवत 5 लाख रुपये बक्षिसाचे मानकरी ठरली आहे. व्दितिय क्रमांक वेंगुर्ले तालुक्यातील परुळेबाजार ग्रामपंचायतने तर तृतीय क्रमांक दोडामार्ग तालुक्यातील विर्डी ग्रामपंचायत ठरली आहे. या दोन्ही ग्रामपंचायती अनुक्रमे तीन लाख व दोन लाख रुपये बक्षिसाच्या मानकरी ठरल्या आहेत.
त्याचप्रमाणे संतगाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा स्व. वसंतराव नाईक पुरस्कार ग्रामपंचायत बिडवाडी, ता. कणकवली रक्कम रुपये 25 हजार प्राप्त केला आहे. शौचालय व्यवस्थापनसाठी देण्यात येणारा स्व. आबासाहेब खेडेकर पुरस्कार ग्रामपंचायत आदुर्ले ता. कुडाळ रक्कम रुपये 25 हजार प्राप्त केला आहे. तर पाणी गुणवत्ता व्यवस्थापन अंतर्गत देण्यात येणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ग्रामपंचायत निरवडे, ता सावंतवाडी रक्कम रुपये 25 हजार प्राप्त केला आहे.
जिल्हास्तर संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात प्रथम व व्दितीत येणा-या ग्रामपंचातीची निवड विभागस्तरावर करण्यात येते. सन 2019-20 करीता जिल्ह्यातील ग्रामपचायत बापर्दे व परुळेबाजार यांची निवड करण्यात आली आहे. मागिल दोन वर्षात संत गाडगेबाबा अभियानात विभागस्तरावर जिल्ह्यातील निवड झालेल्या ग्रामपंचायतीचेच वर्चस्व राहिले आहे. अशी माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी विनायक ठाकुर यांनी दिली.