*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून ताप प्रतिबंध मोहीम हाती…*
*भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली*
*जिल्ह्यातील आरोग्य केंद्राअंतर्गत रुग्णांचा सर्वे सुरू…*
*सिंधुदुर्गनगरी*
जिल्ह्यात लेप्टोचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. तसेच जिल्ह्यात तापाचे रुग्ण सुद्धा वाढले आहेत. तापाच्या रुग्णाबाबत जिल्ह्यात गंभीर स्थिती आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने ‘ताप’ प्रतिबंध मोहिम हाती घेतली आहे. जिल्ह्यातील ३५ आरोग्य केंद्राअंतर्गत ताप रुग्णाचा सर्व्हे सुरु करण्यात आला आहे. कोरोनामुळे तापाचे रुग्ण टेस्ट करून घेण्यास घाबरत आहेत. त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामाची जाणीव जागृती करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य गावोगावी जाणार आहेत. ताप असलेल्या प्रत्येक रुग्णाचा शोध घेवून त्यांची कोविड, लेप्टो व मलेरिया या तिन्हीची टेस्ट करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यानी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील पत्रकार कक्षात तेली यानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक, आरोग्य सभापती सावी लोके, गटनेते रणजीत देसाई, कुडाळ सभापती नूतन आईर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना तेली यांनी जिल्ह्यात सध्या कोरोनापेक्षा लेप्टो या साथ रोगाची दहशत आहे. जिल्ह्यात आज सकाळ पर्यंत १०९ रुग्ण मिळाले आहेत. त्यातील ५ मृत्यु आहेत. मात्र, प्रत्येक्षात मृत्यु आकडा २० च्या घरात आहे. त्यामुळे याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासन व पालकमंत्री, सत्ताधारी आमदार-खासदार गंभीर दिसत नाही. मात्र, जिल्हा परिषदेने याबाबत सर्व्हे सुरु केलेला असून पहिल्या टप्प्यात ५६ हजार ३१८ लोकांना डॉक्सी सायक्लीन या प्रितिबंध गोळ्याचे वाटप करण्यात आले आहे.