*कोकण Express*
*मालवण बाजारपेठेतील रस्त्याच्या कामास लवकरच सुरवात…*
*व्यापारी संघाच्या पाठपुराव्याला यश ; मुख्याधिकाऱ्यांसह, अभियंत्यांचा केला सत्कार…*
*मालवण ः प्रतिनिधी*
शहरातील बाजारपेठेतील दुर्दशा झालेल्या रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आमदार वैभव नाईक यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला. लवकरच या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास सुरवात होणार आहे. या पार्श्वभूमीवर व्यापारी संघाच्या वतीने मुख्याधिकारी संतोष जिरगे यांचा सत्कार करण्यात आला.
शहरातील बाजारपेठेतील रस्त्यांची अक्षरशः दुरवस्था झाली होती. याचा वाहनचालकांना तसेच उडणाऱ्या धुरळ्यामुळे व्यापाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे व्यापारी संघाच्या माध्यमातून व्यापाऱ्यांनी गेल्या महिन्यात मुख्याधिकारी श्री. जिरगे यांची भेट घेत लक्ष वेधले होते. त्यानुसार लवकरच या रस्त्याचे काम मार्गी लावू असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांना दिले. पालिकेचे आवेक्षक सुधाकर पाटकर, अभियंता सोनाली हळदणकर, राजा केरीपाळे यांनी या कामाचे अंदाजपत्रक बनवून त्याला तांत्रिक मंजुरी घेतली. या कामाची निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर, शहर व्यापारी संघाचे कार्यवाह रवी तळाशीलकर, अरविंद सराफ, उमेश शिरोडकर, नंदू गवंडी, शैलेश पालव, ओंकार चिंदरकर, सरदार ताजर, बाबाजी बांदेकर, सुनील मालंडकर आदी व्यापारी उपस्थित होते. या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून दर्जेदार पद्धतीचे व्हावे अशी अपेक्षा व्यापाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.
या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामासाठी आवश्यक निधी आमदार वैभव नाईक यांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल व्यापारी संघाच्यावतीने त्यांचेही आभार मानण्यात आले.