*कोकण Express*
*राणेंचे सु्क्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्रालय २४ फेब्रुवारीपासून सिंधुदुर्गात…*
*राजन तेली यांची माहिती ; कुडाळमध्ये भव्य उद्योजक मेळावा…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून कोकणात नवीन रोजगार संधी आणि उद्योग निर्माण व्हावेत, यासाठी २४ फेब्रुवारीपासून उद्योग मंत्रालय सिंधुदुर्गात येत आहे. या खात्यामधील सर्व सचिव आणि वरिष्ठ अधिकारी सिंधुदुर्गात येऊन मार्गदर्शन करणार आहेत. यात २५ फेब्रुवारीला कुडाळला भव्य उद्योजक मेळावा होणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली.
श्री.तेली म्हणाले, राणेंच्या मंत्रालयातील ७० अधिकारी गुरूवारी (ता.२४) सिंधुदुर्गात येणार आहेत. तर २५ रोजी कुडाळ येथील नवीन बसस्थानकाच्या पटांगणावर उद्योग मेळावा होणार आहे. हा मेळावा सलग सात दिवस चालणार आहे. तर ओरोस येथील शरद भवनमध्ये सकाळी ११ ते सायंकाळी चार या वेळेत विविध क्षेत्रातील उद्योग संधींबाबतचे मार्गदर्शन तज्ज्ञ उद्योग अधिकाऱ्यांच्या माध्यमातून होणार आहे.
२६ रोजी एससी आणि एसटी घटकांसाठी असणाऱ्या विविध योजनांबाबतची माहिती कणकवलीतील प्रहारभवन येथे मेळावाच्या माध्यमातून दिली जाणार आहे. यात दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सचे मिलिंद कांबळे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच काथ्या उद्योग विभागाचे उद्घाटन देखील होणार असल्याची माहिती श्री.तेली यांनी दिली.