*कोकण Express*
*थकबाकीदार, निवडणुकीत मतदार नसलेल्यांना संचालक बनविणे योग्य नाही…!*
*आम.नितेश राणे यांच्या स्वीकृत संचालक निवडीनंतर संचालक सुशांत नाईक यांची टीका…!*
*जिल्हा बँक हा राणे समर्थकांचा राजकीय अड्डा बनु नये…!*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आर्थिक दर्जा उंचवावा व यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, बँक ग्राहकांची प्रगती व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेत तज्ञ व्यक्तीची स्वीकृत संचालक पदी निवड केली जाते. मात्र आज जिल्हा बँकेच्या बैठकीत झालेल्या स्वीकृत संचालक या निवडीकरिता तज्ञ स्वीकृत संचालक निवडीचे निकष बाजूला ठेवत सत्ताधारी संचालक पॅनल कडून आमदार नितेश राणे यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले. आमदार नितेश राणे हे बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना जिल्हा बॅंक निवडणुकीत मतदानाचा देखील अधिकार नव्हता. थकबाकीदार असलेल्या व मतदानाचा अधिकार नसलेल्या व्यक्तीला स्वीकृत संचालक बनविणे हे बँकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही. अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक यांनी केली आहे.
महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम (घ) खंड 11 नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल त्या प्रमाणे 11 – अ, तज्ञ संचालक याचा अर्थ बँकिंग, व्यवस्थापन, सहकार व वित्त व्यवस्था या क्षेत्रा मधील अनुभव असलेली व्यक्ती असा आहे. त्यामध्ये संबंधित संस्थेने हाती घेतलेली उद्दिष्टे व कार्य यांच्याशी संबंधित अन्य कोणत्याही क्षेत्रातील विशेषज्ञता धारण करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो. असेही श्री नाईक यांनी म्हटले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जरी राणे समर्थक प्रणित पॅनलला बहुमत मिळाले, तरी निवडीनंतर जिल्हा बँकेत राजकारण असू नये हे आमचे मत आहे. मात्र ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती केली गेली. ती पाहता येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राणे समर्थकांच्या राजकारणाचा अड्डा बनवू नये. अशी अपेक्षा आहे. असा टोला देखील श्री नाईक यांनी लगावला.