*कोकण Express*
*जिल्हा बँक प्रशासन व्यवस्थापक शरद सावंत यांची तडकाफडकी दोडामार्ग ला बदली*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक झाल्यानंतर आता जिल्हा बँकेच्या वर्तुळात बदल्यांच्या हालचालींना सुरुवात झाली आहे. यामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सुरुवातीपासूनच चर्चेत असणाऱ्या व जिल्हा बँकेचे प्रशासन व्यवस्थापक या पदावर कार्यरत असणाऱ्या शरद प्रभाकर सावंत यांची तडकाफडकी दोडामार्ग येथील शाखा व्यवस्थापक पदावर बदली करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर भाजपची सत्ता आल्यानंतर काही अधिकारी, कर्मचारी हे रडारवर असल्याचे बोलले जात होते. यात शरद सावंत यांच्या बदलीची मोठी चर्चा जिल्हा बँक गोटात सुरू होती. शरद सावंत यांची बदली करत असताना त्यांच्याकडील पदभार अन्य अधिकाऱ्यांकडे हस्तांतरित करून बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. तसेच शाखा व्यवस्थापक शाखा दोडामार्ग म्हणून कामकाज करण्याच्या देखील सूचना श्री सावंत यांना देण्यात आल्याआहेत. श्री सावंत यांच्या सोबत अन्य देखील काही अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र सुरू झाले असून, अजून काही अधिकारी व कर्मचारी बदलीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे.