*कोकण Express*
*कोकण आयुक्तांसह सीईओना प्रशिक्षणाची गरज; प्रशिक्षणाचा खर्च आमच्याकडून*
*भाजपा गटनेते रणजित देसाई यांची पत्रकार परिषदेत माहिती*
*राज्यपालांसह मुख्यमंत्र्यांशी करणार पत्रव्यवहार*
*सिंधुदुर्ग*
कोकण आयुक्त यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राज्य सरकारने प्रशिक्षण द्यावे. त्यांचा निर्णय घेण्यासाठी परिपूर्ण अभ्यास नाही. यासाठी येणारा खर्च सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील भाजपचे ३१ सदस्य देतील. अशाप्रकारचा पत्रव्यवहार राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषद विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना करणार आहोत, अशी माहिती भाजप गटनेते रणजित देसाई यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
याबाबतची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष दालनात देसाई यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेला सदस्य संतोष साटविलकर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना देसाई यांनी, जिल्हा परिषद सूचीप्रमाणे आतापर्यंत जिल्हा परिषद स्वनिधीतून पायवाटा विकासासाठी निधी मंजूर करण्यात येत होता. त्यानुसार यावर्षी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता घेत निधीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, स्वनिधी पायवाटा विकासावर खर्च करण्यात येतो, अशी आमची धारणा आहे. परंतु निधी खर्च करायचा की नाही याबाबत मार्गदर्शन करावे, असे कोकण आयुक्त यांना पत्र पाठविले आहे. त्याला ३५ दिवस झाले आहेत. आयुक्तांनी मंत्रालय पातळीवर हे पत्र पाठविले आहे. अद्याप याचे उत्तर न आल्याने प्रशासन निधी खर्च करत नाही. परिणामी हा निर्णय घ्यायला आयुक्त, मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा प्रशासकीय अभ्यास परिपूर्ण नाही, त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्याची मागणी आपण करणार आहोत, असे देसाई यांनी सांगितले.

