*कोकण Express*
*कणकवलीत दशावतारी लोकराजा सुधीर कलिंगण यांना आदरांजली अर्पण..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
जिल्ह्यातील आप्पासाहेब पटवर्धन चौक, कणकवली येथे दशावतारी लोकराजा, नटसम्राट सुधीर कलिंगण यांना आज आदरांजली अर्पण करण्यात आली.

नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळ, आपण आहात म्हणून आम्ही, ॐ नमो भगवते भालचंद्राय तसेच पोलीस दलाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या श्रध्दांजली च्या वेळी गेले काही दिवस कला सृष्टीवर दैवी घालेल सातत्याने होत आहेत. कलाकार इहलोकीची यात्रा संपवीत आहेत. हे अपरिहार्य असले तरी निश्चितच दु:खदायक आहे आणि आता तर सिंधुदुर्गातील जगप्रसिद्ध दशावतारातील जगप्रसिद्ध लोकराजा सुधीर कलिंगण यांची एक्झिट झाली हे अतिशय वेदनादायक आहे. परंपरागत “दशावतार नाट्य मंडळाच्या” दुसऱ्या पिढीतील कलाकारांना आपण मुकलो आहोत. राज्य परिवहन सेवेत चालक म्हणून सेवा बजावताना ही त्यांनी आपल्यातील कलाकार जिवंत ठेवला, एवढेच नव्हे तर पुढील पिढीतील आपल्या पुत्रांना साथीला घेऊन प्रथमच विस्मयकारी ट्रीकसिन्स सह दशावतार पेश केला. हे सर्व करत असताना प्रकृती कडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्यांचे अकाली निधन झाले, ही एक प्रकारे आपल्या समाजाचीच चुक आहे. प्रत्येक कलाकाराला आपण सर्वतोपरी सहाय्य करुन लोककला जगवल्या पाहिजेत, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार श्री. अशोक करंबेळकर यांनी केले, लोकराजा सुधीर (शिवराम) कलिंगण शोक सभेत ते बोलत होते.
![]()
जेष्ठ नागरिक संघाचे जिल्हाध्यक्ष श्री. दादा कुडतरकर म्हणाले की, आमच्या लहानपणापासून ‘रात्री राजा.. सकाळी डोक्यावर बोजा’ हे आम्ही ऐकतोय, पहातोय यामध्ये बदल व्हायला पाहिजे, तरच लोककला टिकतील.

सुधीर कलिंगण यांचे सोबत काम केलेले रिक्षा व्यावसायिक श्री. संजय झगडे यांनी लोकराजा च्या कामाचे व कलाकाराचे यथार्थ चित्रण करून दोन-चार प्रसंगातील कसोटीला नटसम्राट सुधीर कसा उतरला हे विषद केले.

कणकवली चे पोलीस निरीक्षक श्री. सचिन हुंदळेकर म्हणाले की, मी आजपर्यंत दशावतार पाहिलेला नाही, परंतु सुधीर कलिंगण यांचे बाबतीत प्रसिध्द झालेले लेखन व अन्य वक्त्यांनी केलेले वर्णन ऐकल्यावर माझी उत्सुकता जागृत झाली आहे आणि माझ्या कोकणातील कारकिर्दीत मी दशावताराला नेहमीच प्राध्यान देण्याचा प्रयत्न करणार आहे.

पत्रकार श्री. विजय गावकर म्हणाले, सुधीर ची रंगमंचावरील सहज अभिनयाची पध्दत पाहता व त्यांच्यात संचारलेली भुमिका विचारात घेता, दुसरा “राजा” आता होणार नाही, अशी मला भिती वाटत आहे. सहज सुंदर अभिनयाने त्यांनी सातासमुद्रापार असलेल्या दशावतारी प्रेमींना कायमच आनंद दिला.

दशावतारी अजिंक्य तारा-लोकराजा-नटसम्राट- सिंधुरत्न तुम्ही, अलोट लोटला जनसागर तुमच्या यात्रेस, डोळे पाणावले प्रत्येकाचे, नाही अपवाद कोणी, झाले बहु होतील बहु परंतु या सम हाच, परी राहीलास तु अजिंक्य तारा रंगपटलावरती, अशा शब्दांत श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी आदरांजली अर्पण केली.

सर्व उपस्थितीतांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली अर्पण केली.

