*कोकण Express*
*कवी रमेश सावंत यांच्या काव्यसंग्रहाचे समीक्षक रमेश साळुंखे यांच्या हस्ते 13 रोजी प्रकाशन*
*कणकवली ः प्रतिनिधी*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध कवी रमेश सावंत (देवसू) यांच्या अष्टगंध प्रकाशन मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या ‘मी देशाचा सातबारा लिहीन म्हणतो’ या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा 13 फेब्रुवारी रोजी सायं. 7 वा. ऑनलाईन आयोजित करण्यात आला आहे. समाज साहित्य संघटना सिंधुदुर्गतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून समीक्षक प्रा. डॉ. रमेश साळुंखे यांच्या हस्ते सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती समाज साहित्य संघटनेचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर यांनी दिली.
कवी रमेश सावंत यांचा ‘मी देशाचा सातबारा लिहिन म्हणतो’ हा काव्यसंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. त्याच्या ऑनलाइन प्रकाशन सोहळ्यात या संग्रहावर तरूण समीक्षक प्रा जिजा शिंदे(औरंगाबाद) कवयित्री सरिता पवार, नीलम यादव, प्रमिता तांबे आणि कवी विजय सावंत भाष्य करणार आहेत. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा वैभव साटम करतील. कवी सावंत हे गेली अनेक वर्ष निष्ठेने काव्यलेखन करत असून त्यांचे अनेक कवितासंग्रह यापूर्वी प्रसिद्ध झाले आहेत. त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.’मी देशाचा ‘सातबारा लिहीन म्हणतो’ या काव्यसंग्रहातील एकूण कवितेचा अविष्कार हा वर्तमानाचा कोलाहल आहे. आजच्या असत्य युगावर परखड भाष्य करताना ही कविता एक सुंदर स्वप्नवत जग निर्माण करण्याची अभिलाषा बाळगते. मूल्यांचा ऱ्हास, विवेकशून्य वर्तमानस्थिती, मन विषण्ण करत जाणारे नाते सबंध, जाती धर्मांचं दुभंगलेपण, मनाचा निर्घृण कोरडेपणा, बंधुत्वाची भावना संपवून समतेला प्राप्त झालेलं विटाळपण या सगळ्या विदीर्ण अवस्थेतेचं आजचं एक काळोखं जग हे या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. या कवितेची ही आशयसूत्रे समजून घेण्यासाठी कविता रसिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.