कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

*कोकण Express*

*कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार*

*भाजपा पदाधिकाऱ्यांचा वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठिय्या*

*कणकवली ः प्रतिनिधी

कणकवली उपजिल्हा रुग्णालयाच्या समस्यांबाबत पाच दिवसांपूर्वी लक्ष वेधले यानंतरही त्यात कोणतीही सुधारणा झालेली नसल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पुन्हा एकदा व उपजिल्हा रुग्णालयात धडक दिली. यावेळी रुग्णांना भेडसावणाऱ्या समस्या बरोबरच उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक सहदेव पाटील शस्त्रक्रियेसाठी पैसे घेत असल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला.

यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही अशी आक्रमक भूमिका भाजपा पदाधिकाऱ्यांनी घेत वैद्यकीय अधीक्षकांच्या दालनात ठिय्या मांडला. यावेळी उपस्थित डॉक्टर सतीश टाक यांना भाजपा पदाधिकाऱ्यांनी धारेवर धरत जाब विचारला. भाजपा पदाधिकारी ठाण मांडून बसलेले असताना एका वैद्यकीय दाखल्यासाठी डॉक्टर सतीश टाक यांनी 200 रुपये घेतल्याचा आरोप भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. तसेच या घटनेचे व्हिडीओ चित्रीकरणही करण्यात आले. मात्र याबाबत डॉक्टर टाक यांना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी जाब विचारला असता त्या दाखला धरक व्यक्तीने माझ्या खिशात हात घातला तो कशासाठी घातला ते मला माहीत नाही अशी भूमिका घेत सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. तब्बल एक तास ठिय्या मांडून बसलेले भाजपा पदाधिकारी आक्रमक झाल्यानंतर अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील डॉक्टर शाम पाटील हे उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले. त्यांनी भाजपा पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत, वार्ड क्रमांक पंधरा ची पाहणी केली. या वेळी तेथील दुरावस्था बघून त्यांनी सदर प्रकार रुग्णालय व्यवस्थापनाने गांभीर्याने घ्यायला हवा होता असे स्पष्ट केले. तसेच शौचालयांची असलेली अस्वच्छता ही बाब योग्य नाही असे सांगत यासंदर्भात जिल्हा शल्यचिकित्सकांशी कणकवलीत मंगळवारी बैठक आयोजित करण्याचे मान्य केले.

भाजपा पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर टाक हे वारंवार पैसे घेण्याचे प्रकार करत आहेत त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे अशी भूमिका घेतली. तसेच यावेळी केलेले व्हिडिओ चित्रीकरण डॉक्टर श्रीपाद पाटील यांना दाखविण्यात आले. त्यावर डॉक्टर पाटील यांनी याबाबत लेखी तक्रार द्या शल्यचिकित्सकांशी बोलून या संदर्भात कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले. वैद्यकीय अधीक्षक आठवड्यातून दोनच दिवस हजर असतात असे असताना हजेरी पुस्तकावर त्यांच्या महिन्याच्या उपस्थितीच्या सह्या कशा असा सवाल भाजपा युवा मोर्चाचे संदीप मेस्त्री यांनी केला. तर कोरोना काळात गडहिंग्लज येथे जाऊन आल्यानंतर चौदा दिवस डॉक्टर सहदेव पाटील क्वारटाइन होते त्या कालावधीतही त्यांच्या हजेरी मस्टरवर सह्या कशा असा सवाल केला. नगरसेवक शिशीर परुळेकर यांनी उपजिल्हा रुग्णालयात सुरु असलेला अनागोंदी कारभार हा रुग्णांच्या जीविताशी खेळण्याचा प्रकार आहे हे असले प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला. तर नगरसेविका मेघा गांगण यांनी रुग्णसेवेसाठी राजरोसपणे पैसे घेतले जात असतील तर या डॉक्टरांना लाज कशी वाटत नाही असा संतप्त सवाल उपस्थित केला. या साऱ्या प्रश्नांबाबत येत्या मंगळवारी बैठक घेऊन संबंधितांवर कारवाई केली जाईल, सदर घडलेले प्रकार हे योग्य नाहीत असे डॉक्टर पाटील यांनी सांगितले. प्रसूती वार्ड क्रमांक पंधरा मध्ये शौचालयांमध्ये पाण्याचे मग नाहीत त्या वार्डात डस्टबिन नाही या किरकोळ खर्चासाठी जर वाट पाहिली जात असेल तर त्या वॉर्डातील लहान मुलांना इन्फेक्शन झाले किंवा त्रास झाला तर त्याला जबाबदार कोण असा सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. आम्ही पाच दिवसांपूर्वी येथे येऊन प्रश्न मांडूनही जर सुटत नसतील आमचा वेळ जात नाही म्हणून येतो का असा सवाल परूळेकर यांनी केला. तर डॉक्टर सहदेव पाटील हे गडहिंग्लज येथे आहेत ते तीन दिवस कणकवलीत असतात.

प्रसूती वार्डातील माता व नवजात बालकांना चांगल्या वार्डात  शिफ्ट का केला नाही असा सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला असता पेशंट जायला तयार नाहीत असे डॉक्टर टाक यांनी सांगितले. मात्र नवजात बालक व त्यांच्या मातांना इन्फेक्शन होऊ नये म्हणून हा निर्णय त्यांनी घ्यायचा की डॉक्टर म्हणून तुम्ही घेणारा असा सवाल उपस्थित करण्यात आला. आतापर्यंत सर्वच विषय तुम्ही मस्करी वर घेतलात या सगळ्या बेजबाबदारपणा ला तुम्हीही तेवढेच जबाबदार आहात असा आरोप डॉक्टर टाक वर यांच्यावर भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी डॉक्टर श्रीपाद पाटील डॉक्टर श्याम पाटील यांच्यासमोर भाजप पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांचा पाढाच मांडला. 11 नोव्हेंबर पासून डॉक्टर सहदेव पाटील हे उपजिल्हा रुग्णालयात हजरच नाहीत अशा स्थितीत त्यांनी रजा अर्ज दिला की बेकायदेशीर अनुपस्थिती आहे असा सवाल भाजपा पदाधिकाऱ्यांना केला. आतापर्यंत डॉक्टर शिकलगार यांची तक्रार येत नाही मात्र डॉक्टर टाक यांच्या बाबतीत तक्रारींचा आलेख वाढता का असा सवाल संदीप मेस्त्री व अण्णा  कोदे यांनी केला. यावेळी भाजपाकडून आवाहन करताना शस्त्रक्रियेसाठी उपजिल्हा रुग्णालयात पैसे मागले गेले तर भाजपाच्या पदाधिकारी किंवा कार्यालयात संपर्क साधा पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची धिंड काढण्यात येणार असा इशारा शिशिर परुळेकर यांनी दिला. यावेळी भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेविका मेघा गांगण, शिशिर परुळेकर, युवा मोर्चा सरचिटणीस संदीप मेस्त्री, बबलू सावंत, संतोष पुजारे, सचिन पारधीये, गीतांजली कामत, महिला शहराध्यक्ष प्राची कर्पे आदी उपस्थित होते.
यावेळी पोलीस बंदोबस्तही कार्यरत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!