*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या देवदूतांचा केला गौरव*
*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेने घेतली त्यांच्या कार्याची दखल*
*कासार्डे ः संजय भोसले*
कोरोना काळात सर्व रुग्णांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा करण्याचे महत्त्वाचे कार्य करणाऱ्या कुडाळ येथील ओम साई ऑक्सिजन कंपनीचे मालक दिपक कुडाळकर व त्यांच्या टीमचा ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
कोरोना सारख्या महामारीच्या काळात रुग्णांना मोठी समस्या भेडसावत होती ती ऑक्सिजनची.संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याची ऑक्सिजन तहान भागविण्याचे काम कुडाळ येथील ओम साई ऑक्सिजन कंपनीने अविरतपणे करीत आहे.ऑक्सिजन सिलेंडरच्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभरातील सर्व सरकारी व खाजगी रुग्णालयांना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजन सिलेंडरचा वेळीच पुरवठा करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले.
कोरोना कालावधीत जिल्ह्यामध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू दिली नाही. जिवाची पर्वा न करता दिवस-रात्र ऑक्सिजन पुरवठा संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याला केला व लाखो लोकांचे प्राण वाचविले.अशा देवदूतांचा सत्कार ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक व जिल्हा निरीक्षक मनोज तोरस्कर यांच्या हस्ते कुडाळ येथील कंपनीच्या स्थळी जाऊन करण्यात आला.
यावेळी सत्कार मुर्ती ओमसाई ऑक्सिजन कंपनीचे संचालक दिपक कुडाळकर व त्यांच्या टीमचे सहकारी शंकर सावंत, हरीप्रसाद चव्हाण,महेश सावंत,भाऊ सरमळकर,ज्ञानेश पालव यांना संघटनेच्या वतीने प्रमाणपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरविण्यात आले.