त्रिपुरोत्सवापूर्वी कणकवली-नागवे रस्ता दुरुस्त करा

*कोकण Express*

*त्रिपुरोत्सवापूर्वी कणकवली-नागवे रस्ता दुरुस्त करा…*

*नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांची मागणी : डागडुजी न झाल्यास आंदोलन…*

*कणकवली ः प्रतिनिधी*

कणकवली शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्रीस्वयंभू मंदिराकडे जाणारा कणकवली-नागवे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा. त्रिपुरारी पौर्णिमेपूर्वी या खड्डेमय रस्त्याची डागडुजी न झाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह भाजप पदाधिकार्‍यांनी आज सार्वजनिक बांधकाम विभागाला दिला.
कणकवली शहराचे प्रमुख ग्रामदैवत असलेल्या श्रीस्वयंभू मंदिरात ३० नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव होणार आहे. मात्र या मंदिराकडे जाणारा रस्ता पूर्णतः: खड्डेमय झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहन चालकांची मोठी गैरसोय होत आहे. नागरिकांनाही या खड्डेमय रस्त्याचा मोठा त्रास होत आहे. त्याअनुषंगाने नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्यासह नगरसेवक अभिजित मुसळे, भाजपा शहराध्यक्ष अण्णा कोदे, नगरसेवक शिशिर परुळेकर, किशोर राणे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन विठ्ठल देसाई, सुशील पारकर आदींनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्रीमती के.के.प्रभू यांची भेट घेतली. यावेळी येत्या ३० नोव्हेंबर पूर्वी शहरातील पटकीदेवी मंदिर ते श्रीस्वयंभू मंदिर पर्यंतच्या रस्त्याची डागडुजी करण्याबाबतचे निवेदन देण्यात आले.
यावेळी झालेल्या चर्चेत श्रीमती प्रभू यांनी सदर रस्ता बजेटमधून प्रस्तावित असून त्याची वर्क ऑर्डर झालेली नसल्याने काम रखडले असल्याची माहिती दिली. तर वर्क ऑर्डरची वाट पाहू नका तातडीने रस्त्याची डागडुजी करा अशी मागणी नलावडे व शिष्टमंडळाने केली. त्यावर तात्पुरती डागडुजी करण्यासाठी काम प्रस्तावित आहे. मात्र त्याचीही अद्याप वर्कऑर्डर झालेली नसल्याचे प्रभू यांनी सांगितले. तर डांबरीकरणाचे जे काम करण्यात येईल त्याची गुणवत्ता असायला हवी. काम सुरू करताना शहराच्या हद्दीत काम असल्याने नगरपालिकेचे प्रतिनिधी तेथे थांबून काम करून घेतील असे नगराध्यक्ष नलावडे यांनी सांगितले. तर सदर रस्त्याचा दर्जा शहरातील हद्दी पुरता नगरपंचायतीकडे वर्ग करून दिल्यास त्या भागातील जमीनमालकांना बांधकामे करणे सोपे जाईल अशी मागणी हर्णे यांनी केली. त्यावर दर्जा अवनत करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचे आश्वासन श्रीमती प्रभू यांनी दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!