*कोकण Express*
*सावंतवाडी पालिकेच्या दुर्लक्षामुळे सालईवाडा परिसरात उघड्या गटारांमुळे दुर्गंधी…*
*योग्य ती कार्यवाही करण्याची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी…*
*शिवसेना शाखा प्रमुख प्रतिक बांदेकर*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
येथील सालईवाडा परिसरात उघड्या गटारांमुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. तर त्याचा परिणाम येथील नागरिकांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. मात्र नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप शिवसेना शाखा प्रमुख प्रतिक बांदेकर यांनी केला. दरम्यान परिसरात नव-नवीन इमारती उभारण्यात आल्यामुळे त्याचे योग्य नियोजन न झाल्याने ही सांडपाण्याची समस्या उद्भवली आहे. त्यामुळे पालिकेने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही त्यांनी केली. याबाबत श्री.बांदेकर यांनी मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांना निवेदन दिले.
त्यात असे नमूद करण्यात आले आहे की,सालईवाडा भागात ठीक-ठिकाणी गटारे उघडे असल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या भागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असून, गेली अनेक वर्ष या भागात नव नवीन इमारती होत आहेत. परंतु, जुन्या गटारांमुळे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील अनेक ठिकाणची गटारे उघडी असल्याने दुर्गंधी आणि रोगराई पसरण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. या भागातील जलवाहिन्या भविष्यात मलवाहिन्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत योग्य त्या उपाय योजना करा, असे म्हटले आहे.