*कोकण Express*
*तळेरे येथील डोंगरे किराणा दुकाना समोरील महावितरण कंपनीची वीजपुरवठा करणारी मुख्य डीपी सताड उघडी*
*शाॅक लागून दुर्दैवी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण?*
*ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी कनिष्ठ अभियंत्यांचे लक्ष वेधले*
*कासार्डे ः संजय भोसले*
मुंबई गोवा महामार्गानजीक तळेरे येथील डोंगरे किराणा दुकाना समोर बसविण्यात आलेली महावितरण कंपनीची वीजपुरवठा करणारी मुख्य डीपी सताड उघडी ठेवण्यात आली आहे.याबाबत चुकून एखाद्याला शाॅक लागून दुर्दैवी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवली तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी तळेरे उपविभागाचे कनिष्ठ अभियंता श्री.गावकर यांची भेट घेऊन उपस्थित केला.
मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले असले तरी बऱ्याच समस्यांचा नाहक त्रास स्थानिक ग्रामस्थ तसेच वाहन चालकांना होत आहे.चौपदरीकरणाचे काम करीत असते वेळी रस्त्याशेजारी असलेले वीजेचे पोल तसेच वीजवितरणच्या डीपी अन्य ठिकाणी हलविण्यात आल्या.मात्र तळेरे येथील डोंगरे दुकानासमोर बसविण्यात आलेली डीपी सताड उघडी असून ती सर्व्हीस रोड शेजारील पदपथाला लागून आहे.त्या डीपीला बंद करण्यासाठी दरवाजाच शिल्लक नाही आहे.आणि सदरची डीपी जमिनीलगत कमी उंचीवरती बसविण्यात आली असल्याने तसेच सदरचे ठिकाण हे नेहमीचे वर्दळीचे ठिकाण असून शालेय विद्यार्थी,लहान मुले तसेच ग्रामस्थ सतत येतजात असतात.
तळेरे येथे महामार्गालगतचे सर्व्हिस रस्ते, गटारे व फुटपाथ यांचे काम ओबडधोबड होत असतानाच त्यालगत बसविण्यात आलेल्या वीज उपकरणांच्या विद्युतभारीत तारा (वायर्स) निष्काळजीपणे खुल्या ठेवण्यात आल्या असून याकडे संबंधित यंत्रणेने संपूर्णपणे दुर्लक्षच केले आहे. जर याठिकाणी एखादा अपघात घडून जीवितहानी झाली तर त्यास जबाबदार कोण? असा प्रश्न राजेश जाधव यांनी कनिष्ठ अभियंता श्री. गावकर यांना विचारुन महावितरण तळेरे विभाग कार्यक्षेत्रातील सर्व उघडे असलेले वीज डी.पी.व धोकादायक वीज तारा व पोल इत्यादींची पाहणी करून त्याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.