*कोकण Express*
*वाघेरी सरपंच संतोष राणे यांना ग्रामविकास मंत्र्यांचाही दणका*
*सरपंच तसेच सदस्य पदावरून अपात्र ठरवत विभागीय आयुक्तांचा निर्णय केला कायम*
*कणकवली ः प्रतिनिधी*
वाघेरी सरपंच संतोष राणे यांचे अपील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी फेटाळून लावत संतोष राणे यांना सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरविण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. विभागीय आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरोधात संतोष राणे हे कुठलाच सबळ पुरावा सादर करू शकले नाही. तसेच त्यांच्यावरील आरोप हे जि. प. मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत सिद्ध झाले आहेत. तसेच विभागीय आयुक्तांनीही याबाबत आपल्या निर्णयात संतोष राणे यांना सरपंच व ग्रा. पं. सदस्य पदावरून अपात्र ठरवले आहे.
विभागीय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात राणे यांनी ग्रामविकास मंत्र्यांकडे अपील केले होते. या अपिलावर 11 जानेवारी रोजी सुनावणी घेण्यात आली होती. या सुनावणीचा 13 जानेवारी रोजी निकाल देताना ग्रामविकास मंत्र्यांनी विभागीय आयुक्तांनी दिलेला निर्णय कायम ठेवत संतोष राणे यांचे अपील फेटाळले आहे. त्यामुळे संतोष राणे यांच्यावर सरपंच पदावरून पायउतार होतानाच ग्रा. पं. सदस्यपद ही गमावण्याची नामुष्की ओढवली आहे.